Tue, Feb 18, 2020 00:47होमपेज › Satara › वाईला विकासाची काशी बनवणार 

वाईला विकासाची काशी बनवणार 

Published On: Sep 16 2019 1:38AM | Last Updated: Sep 15 2019 11:20PM
वाई : प्रतिनिधी
महाजनादेश यात्रेचे वाईत केवळ स्वागत होणार, असे समजून होतो. मात्र, महागणपतीच्या नगरीत महाजनादेश यात्रेचे विराट गर्दीने झालेले स्वागत मदनदादा भोसले यांचा करिष्मा दाखवणारे आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्‍वरच्या विकासासाठी काही कमी पडू देणार नाही. आता जनतेनेही मतदार संघात युतीचा करिष्मा दाखवून द्यावा. आपण वाईला विकासाची काशी बनवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा वाई शहरात दुपारी साडेतीन वाजता दाखल झाली. तत्पूर्वी मदनदादा भोसले यांना महाजनादेश यात्रा रथात सोबत घेवून मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. 

ना. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने प्रामाणिक आणि पारदर्शक असाच कारभार केला. त्यामुळेच संपूर्ण देशात रोजगार निर्मितीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर तर शिक्षणात तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा वाघ जन्मला आणि 370 कलम रद्द करुन खर्‍या अर्थाने त्यांनी भारत एक केला. त्यांच्यासारख्या प्रभावी नेतृत्वामुळेच आज देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही. 

ना. फडणवीस म्हणाले, मदनदादा भोसले यांच्यासारखा खूप जुना मित्र सोबत असल्याने या मतदारसंघाच्या विकासाला खर्‍या अर्थाने चालना मिळाली आहे. या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. 
मदनदादा भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास ज्या गतीने झालाय ती गती थक्क करणारी आहे. आज ते महागणपतीचे व जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठी आले आहेत. 

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री बाळा भेगडे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. संजय काकडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर महाजनादेश यात्रा रथावर उपस्थित होते. 

दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या हद्दीत महाजनादेश यात्रेने प्रवेश केल्यानंतर मदनदादा भोसले यांनी स्वागत केले. तद्नंतर वाटेत ठिकठिकाणी प्रचंड गर्दीने उपस्थित असलेल्या जनतेनेही मुख्यमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत केले.

यावेळी माजी आमदार कांताताई नलवडे, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, वाई नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, महाबळेश्‍वरच्या     नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर, शंकरराव गाढवे, बापूसाहेब शिंदे, विजयाताई भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.

मदनदादांचा भाषणादरम्यान वारंवार उल्लेख 

वाईत स्वागत स्विकारायचे आणि सातार्‍यात सभेसाठी रवाना व्हायचे, अशा मानसिकतेत असणार्‍या मुख्यमंत्र्यांचे वाईत विराट आणि जल्लोषी स्वागत झाले. मदनदादा विधानसभेत दिसणार, असा दृढ विश्‍वास व्यक्‍त करत वाई मतदारसंघाला विकासाचे तिर्थक्षेत्र बनवू, अशी ग्वाही देत आपल्या भाषणात मदनदादांचा वारंवार उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण सभाच जिंकली. 

वेळे-सुरुरमध्ये यात्रेचे जल्लोषात स्वागत

सुरुर : वार्ताहर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पुणे-बंगळूर महामार्गावरील वेळे, सुरूर गावामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. महामार्गावरील वेळे येथे ही महाजनादेश यात्रा दोन मिनिटे थांबली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना हार घालण्यासाठी गर्दी केली. महाजनादेश यात्रेचा ताफा लगेच  सुरुरच्या दिशेने रवाना झाला. सुरुर येथे काही मिनिटेच महाजनादेश यात्रा थांबली. याठिकाणी महाजनादेश यात्रेचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते तसेच स्वागत कमानीही उभारण्यात आल्या होत्या. कमळ चिन्हाचे फलक हाती घेतलेल्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, या परिसरातील जनतेचे प्रश्‍न आम्हीच सोडवणार असून दुसरे कोणीही तुमचे प्रश्‍न सोडवण्यासाठी येणार नाही. सामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.