Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Satara › जावलीत टंचाई उपाययोजनांचा बोजवारा

जावलीत टंचाई उपाययोजनांचा बोजवारा

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:36AMमेढा : वार्ताहर

उन्हाळा संपायला आला तरी जावली तालुक्याच्या टंचाई उपाययोजनांचा थांगपत्ता नसल्यामुळे अनेकांच्या घशाला कोरड पडली आहे. आढावा बैठकीचे नियोजन दिसत नसून टंचाईग्रस्त गावांचे प्रस्तावही जिल्हा परिषदेत नसते पडून आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला लागून राहिला आहे.

जावली तालुक्यात  उन्हाचा पारा 40 अंशावर पोहचल्याने गर्मीने हाहाकार केला आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. पाण्याची टंचाई बर्‍याच गावांना मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना जावली तालुक्याचा पाणीटंचाई आढावा निम्मा उन्हाळा गेला तरी झाला नाही. दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येतो. यावर्षी पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठका मार्चनंतर दोन झाल्या तरीही लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकार्‍यांना पाणीटंचाईचे महत्व समजेना झालं  आहे.  आज पाणी टंचाईचे भूत तालुक्याच्या 70 टक्के गावांच्या उरावर बसले असून पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. गतवर्षी 65 गावांचे प्रस्ताव टंचाईत मंजूर झाले होते. यावर्षी 37 पैकी फक्त 9 गावांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पाणी टंचाई बाबत सदस्य व आधिकारी तेरी भी चुप और मेरी भी चुप अशाच भुमिकेत आहेत. आठ दिवसांपूर्वी झालेल्या मासिक मिटींगमध्ये फक्त पाण्याच्या विषयावरून आधिकार्‍याला धारेवर धरले पण पुन्हा मात्र ये रे माझ्या मागल्या अशीच गत झाली.
तालुक्यात पाणी टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले असताना पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी मात्र लग्न समारंभात सत्कार स्वीकारण्यात व्यस्त आहेत. पंचायत समितीचा कोणताही ठराव मंजूर करायचे म्हटलं तरी अधिकार्‍यांना चार चार वेळा ठराव मंजूर करून घ्या असं म्हणावं लागते. यावरून आधिकांर्‍यावर सर्वच सदस्यांचा किती दबाव आहे हे सर्व लक्षात येते.

आत्ता तरी संबंधित यंत्रणेला पाणी टंचाईची मिटींग महत्वाची वाटते का? पाणी टंचाईबाबत बर्‍याच गावांचे प्रस्ताव आले असून त्याचा निर्णय शासन दरबारी होतोय का ? असे बरेच प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडले आहेत.

Tags :  sataar, jawali,  water