होमपेज › Satara › कोयना धरणातून पाणी सोडणार

कोयना धरणातून पाणी सोडणार

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 10:35PMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात  72  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात 5.69 टीएमसीने, तर पाणी उंचीत 6.3 फुटांनी वाढ झाली आहे. धरणात 72 टीएमसी पाणीसाठा झाल्याने आगामी काळातील उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर येत्या दोन दिवसांत धरणातून पूर्वेकडे पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. 

कोयना धरणांतर्गत विभागात रविवार सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी तो जोर आणखीनच वाढला. त्यामुळे धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या येथे सरासरी प्रतिसेकंद 45802 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने स्थानिक नद्या, ओढ्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाण्याची फुगी येवून हे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे. धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या पार्श्‍वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी सांगितले. 

कोयना धरणात सध्या एकूण पाणीसाठा 72 टीएमसी पैकी उपयुक्त साठा 68  टीएमसी , पाणीउंची 2132.2 फूट, जलपातळी 649.884 मीटर इतकी झाली आहे. रविवार सायंकाळी पाच ते सोमवारी सायंकाळी पाच या चोवीस तासात व एक जूनपासून आत्तापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 242 मि. मी. ( 2670 ) , नवजा 337   मि. मी. ( 2651) ,  महाबळेश्‍वर 259 मि. मी.  ( 2357 ) पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत धरणात एकूण 47.83 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणाला आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 23  टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.