Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Satara › धोममधून पाणी सोडल्याने कृष्णा दुथडी; वाईच्या गणपती मंदिरात पाणी (Video)

धोममधून पाणी सोडल्याने कृष्णा दुथडी; वाईच्या गणपती मंदिरात पाणी (Video)

Published On: Aug 17 2018 11:49PM | Last Updated: Aug 17 2018 11:49PMवाई : प्रतिनिधी 

वाई तालुक्याच्या पश्‍चिम भागात गेल्या काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धोम धरणात पाण्याची आवक वाढली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धोम धरण 96 टक्के भरले आहे. पाण्याची आवक जास्त असल्याने धरण व्यवस्थापनाने गुरुवारी रात्री 10 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 

यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली असून पाण्याने महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे. वाई तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटींग केल्यानंतर 15 दिवस जणू पाऊस गायबच झाला होता. मात्र, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात असणार्‍या धोम धरणात या पावसामुळे सेकंदाला 6400 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता 13.50 टीएमसी असून सध्या धरण 13.03 टीएमसी भरले आहे. त्यामुळे गुरूवारी रात्रीपासूनच 2 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे वाई शहरात हे पाणी महागणपतीच्या पायाशी आले आहे. या मोसमातील हा पहिला पूर असल्याने या पाण्यात पोहण्याचा अनेकांनी आनंद लुटला. नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने त्यातून धोम धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरातून पाणी मोठ्या प्रमाणात ओढे नाल्यात येत असल्यानेही नदीची पाणी पातळी वाढली आहे. धरणाचे तीन दरवाजे 1 तर दोन दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहे. यामधून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.