Tue, Mar 26, 2019 20:05होमपेज › Satara › वाई पालिकेची इमारत अस्वच्छतेच्या गर्तेत

वाई पालिकेची इमारत अस्वच्छतेच्या गर्तेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाई : यशवंत कारंडे

स्वच्छ अभियानांतर्गत वाई पालिकेला 4 कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. त्यामधून वाई शहराची स्वच्छता करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, वाई पालिकेची इमारत व परिसरच अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे. त्यामुळे प्रथम पालिकेची स्वच्छता करून मगच शहराकडे बघा, अशी टीका नागरिकांमधून होऊ लागली आहे.

वाई पालिकेसाठी सुमारे 8 कोटी 50 लाख रूपयांची सुंदर वास्तू उभी करण्यात आली. मात्र, परिसरात सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेली शोभेची झाडं अक्षरश: वाळून गेली आहेत तर इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील लॉनची अवस्थाही दयनीय झाली आहे. इमारतीच्या पाठीमागील भाग पाहिला तर ही पालिकेची नवीन इमारत आहे का गटारखाना? असा प्रश्‍न पडत आहे.

इमारतीच्या पाठीमागे झाडे झुडपे वाढली असून काँग्रेस गवत माजले आहे. संपूर्ण परिसरात घाण झाली असून इमारतीच्या परिसरात विविध ब्रँडच्या दारुच्या बाटल्या, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, प्लास्टीक ग्लास हे मागील दरवाजाच्या परिसरात पडले आहे. काही दिवसांपूर्वी बिल गेटस् फौंडेशनच्यावतीने परदेशातील पाहुणे येवून पालिका व कचरा डेपोची पाहणी करुन गेले. फक्‍त त्याचवेळी स्वच्छता करण्यात आली होती.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाई पालिकेने शहर स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला आहे. मात्र, त्यांच्याच इमारतीची अस्वच्छता असल्याने पालिकेने प्रथम पालिका इमारत व परिसराची स्वच्छता करावी, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. पालिकेच्या स्वच्छतागृह व इमारतीत काही ठिकाणी झालेली तूट - फूट दुरुस्ती  होणे गरजेचे आहे. यासाठी स्वत: आ. अजित पवार यांनी संबंधितांची कानउघडणी करुनही दखल घेण्यात आलेली नाही. मुख्याधिकारी प्रसाद काटकर हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी पालिका इमारतीच्या परिसरात फेरफटका मारुन परिस्थिती पाहून लॉन, सुशोभिकरणाच्या कुंड्या व इमारतीतील घाण स्वच्छ करुन खर्‍या अर्थाने स्वच्छ वाई योजनेला सुरुवात करावी, अशी अपेक्षा वाईकरांतून व्यक्‍त होत आहे.

सुरक्षा असतानाही मद्यपी येतात कसे?

या अस्वच्छतेकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पालिकेचे आवार मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. वास्तविक पालिका परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची असून त्यांनी कर्मचार्‍यांकडून ही स्वच्छता करुन घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडून तसे होताना दिसत नाही. पालिकेत रात्री सिक्युरिटी असतानाही येथे मद्यपी येतात कसे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.