Tue, Jul 16, 2019 10:08होमपेज › Satara › फसवणूकप्रकरणी तिघांवर गुन्हा 

फसवणूकप्रकरणी तिघांवर गुन्हा 

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 11:30PMखटाव / वडूज  : प्रतिनिधी 

जमिनीचा खोटा दस्त तयार करणे, गौण खनिजाची चोरी करणे तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार  तिघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत वडूज पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सुनील पवार ( चितळी ) यांच्या मालकीच्या व वडिलार्जित वहिवाटीच्या गट नंबर 1715 मध्ये त्यांच्या कुटुंबियांची वहिवाट होती. गट 1702 मधील  9 हेक्टर 11 आर क्षेत्र विक्रम पवार (चितळी)  आणि इतरांनी खरेदी केले. त्यावेळी खरेदी दस्ताला खोटा नकाशा जोडून लबाडीने वहिवाट दाखवली. विक्रम पवार यांनी दोन आणे जमीन शिल्लक ठेवून या जमिनीची पुन्हा विक्री केली. पवार यांची कोणतीही मालकी नसताना खरेदी - विक्री करताना वेगवेगळे नकाशे जोडल्याची तक्रार  सुनील पवार यांनी न्यायालयात केली. 

पिकपाणी नोंदीला जमिनीत विहीरपड दाखवून विक्रम पवार  आणि सहकार्‍यांनी अन्य हिस्सेदारांची संमती न घेता अस्तित्वात नसलेल्या विहिरीचे पाळीपत्रक तयार केले. आणेवारीप्रमाणे मोटर आणि पाईपलाईनचा हिस्साही विकला. विक्रम पवार यांच्या नावे कोठेही स्वतंत्र विहीर, वीजजोड अस्तित्वात नव्हता. त्यांची जमीन पूर्वीपासून खडक व गवतपड असताना, विहीर नसताना बनावट पाळीपत्र तयार केले. नानासो उर्फ नंदकुमार मोरे यांच्या सहकार्याने राजकीय पदाचा गैरवापर करुन गट  1715 मध्ये जादा विद्युत भार जोड घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या जागेत अधिकार नसताना विहीर खोदून त्यातील वाळू आणि मुरुमाची पवनकुमार मोरे आणि इतरांनी विक्री केल्याचे तसेच विहीर खुदाईला विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल  न घेतल्याने सुनील पवार यांनी न्यायालयात तक्रार देवून दाद मागितली होती. त्यानंतर वडूज न्यायालयाने याप्रकरणी वडूज पोलिसांना चौकशी करण्याचे  आदेश दिले होते. त्यानुसार वडूज पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.