Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Satara › जमीन हडपप्रकरणी शिंगाडेवर गुन्हा 

जमीन हडपप्रकरणी शिंगाडेवर गुन्हा 

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 11:04PMवडूज : वार्ताहर

येथील दिगंबर श्रीरंग शिंगाडे याने शहीद जवान रामचंद्र गोपाळ धुरगुडे यांच्या कुटुंबाला शासनाकडून उदरनिर्वाहासाठी मिळालेली जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी वडूज पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहीद जवान रामचंद्र गोपाळ धुरगुडे यांच्या कुटुंबाला शासनाकडून पाच एकर जमीन मिळाली होती. दरम्यान, दिगंबर शिंगाडे याने खोटा मृत्यूचा दाखला, खोटे प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक करत वीर माता हौसाबाई धुरगुडे यांचे एकमेव वारस असल्याची बोगस नोंद करत पाच एकर जमीन हडप केली होती. रामचंद्र गोपाळ धुरगुडे कर्तव्य बजावत असताना दि. 5 डिसेंबर 1971  रोजी शहीद झाले. त्यांच्या पश्‍चात हौसाबाई गोपाळ धुरगुडे (रा. धनगरवाडी, ता. वाई) व त्यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारने वडूज येथील शासकीय मिळकत जुना सर्व्हे नं. 320  व नवीन सर्व्हे नं. 169 मधील 5 एकर जमीन   

उदरनिर्वाहासाठी दिली होती. दि. 31 जुलै  1975 रोजी ही जमीन हौसाबाई धुरगुडे वहिवाट करीत होत्या. परंतु, 1976 मध्ये त्यांचे निधन झाल्याने तसेच खटाव व वाई तालुक्यामध्ये बरेच अंतर असल्याने धुरगुडे कुटुंबियांचे या जमिनीकडे लक्ष कमी झाले. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दिगंबर शिंगाडे याने वडूज तहसीलदार यांच्यासमोर दि. 7  मार्च 2014 रोजी आपणच एकमेव वारस असल्याचे भासवून खोटे प्रतिज्ञापत्र करुन वडूज ग्रामपंचायतीकडून बोगस दाखला मिळवला होता. याबाबत नगरसेवक शहाजीराजे गोडसे, डॉ. संतोष गोडसे, विजय शिंदे व शहाजीराजे मित्र मंडळाने हा प्रकार दि. 3 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन उघडकीस आणला होता. दिगंबर शिंगाडे याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात महसूलचे कर्मचारी अभय शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.