होमपेज › Satara › एक व्हिडीओ ! वाट दाखवतो तर कधी वाट लावतो

एक व्हिडीओ ! वाट दाखवतो तर कधी वाट लावतो

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:20PMसातारा : सुशांत पाटील

 प्रगत तंत्रज्ञानामुळे दुनियेच्या कानाकोपर्‍यात घडणारे प्रकार आपल्याला  ‘व्हायरल व्हिडीओ’ च्या स्वरुपात पहायला मिळत आहेत.  वठलेल्या मनाला उभारी देणारे तर कधी फुलणार्‍या फुलाला तोडणारे व्हिडीओ आपल्यासमोर येत आहेत. अलिकडे  माणसाची विकृती जागे करणारेही काही व्हिडीओ तर काळजात घुसत आहेत. डिजीटल युगामुळे घरबसल्या मोबाईलवर सहजरित्या उपलब्ध होणारे व्हायरल व्हिडीओ आज जीवनाच्या केंद्रस्थानी बनत असून यामुळे माणसाच्या मनाला कधी उभारी मिळतेय तर कधी ठेच लागतेय.

2005 मध्ये यू-ट्यूबची सुरुवात झाली. पुर्वी खास व्हिडिओचा शोध घेण्यासाठी जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या  यू-ट्यूबला सर्च केले जायचे. त्यानंतर 2009 साली सुरु झालेले व्हॉटस् अ‍ॅप हे सर्वांत जलद सेवा देणारे माध्यम म्हणून पुढे येऊ लागले. आता व्हिडीओ पाहण्यासाठी फेसबुक, ट्यूब मेट, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमामध्ये जणू स्पर्धाच सुरु झाली आहे.

नागरिकांच्या आयुष्याला उभारी देणारे अनेक व्हिडीओ आज सोशल मिडियाव्दारे व्हायरल होत आहेत तर अपघात, आत्महत्या, खून यासारखे जगणं संपवणारे  व्हिडीओज् मरण किती स्वस्त आहे, याची जाणीव करुन देत आहेत. 

आज व्हिडीओमुळे सर्वसामान्य नागरिकापासून मोठमोठे राजकीय नेते  आपल्या नानाढंगी उपदव्यापामुळे चर्चेत  येऊ लागले आहेत. त्याचे त्यांना मनस्ताप तर होत आहेतच, त्याचबरोबर बदनामीला सामोरे जावे लागत आहे. व्हायरल प्रकारामुळे तर ते अधिकच बदनाम होऊ लागले आहेत. 

पूर्वी असे व्हिडीओज् फक्‍त पोलिस प्रशासनालाच मिळायचे. ते मिळवतानाही पोलिसांना नाकीनऊ यायची. मात्र अलिकडे व्हायरल संस्कृतीमुळे हे व्हिडीओ घराघरात पोहचू लागले आहेत. सहज उपलब्ध होणार्‍या या व्हायरल व्हिडीओचे जसे फायदे आहेत अनेक तोटेही समोर येऊ लागल्यामुळे व्हायरल प्रकाराला आळा घालणे, अधिकच कठीण होऊन बसले आहेत.