Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Satara › त्यांच्या कष्टात दडलंय पाणीदार गावाचं स्वप्न

त्यांच्या कष्टात दडलंय पाणीदार गावाचं स्वप्न

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 8:49PMसातारा : सुनील क्षीरसागर

तीव्र उन्हाळ्याने सध्या कहर केला असून विशेषत: दुपारच्यावेळी लोक रस्त्यावर फिरकतही नाहीत. डोक्यावर आग ओकणार्‍या सूर्याच्या झळांची दाहकता अंगाची लाहीलाही करत आहे.  मात्र, हातावर पोट असलेल्या कष्टकर्‍यांना उन्हाचा तडाखा सोसत घाम गाळून राबावे लागत आहे. जगण्यासाठी त्यांचा उन्हातान्हात संघर्ष सुरु असून अशा  काबाडकष्ट करणार्‍यांसाठी पंखे, कुलर या गोष्टी अजूनही स्वप्नवतच आहेत. 

यावर्षी माण आणि खटाव तालुक्यांत दुष्काळ संपवण्यासाठी अनेक गावांनी श्रमदानाचा विडा उचलून श्रमासाठी अतोनात संघर्ष केला असून यामध्ये त्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता भर उन्हातही बंधार्‍यांची कामे करून हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले. दुष्काळी भागात सलग कामे करून माण व खटाववासियांनी दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या भर उन्हातील कष्टातच पाणीदार गावाचे स्वप्न दडले आहे. 

दुष्काळी भागातील नागरिकांबरोबरच दररोजच कष्टाची कामे करणार्‍या नागरिकांचा जगण्याचा संघर्ष कधी संपणार? असा सवाल केला जात आहे. उकाड्यानं अंगातून निघणार्‍या घामाचेही लागलीच बाष्प होऊन जावं इतका यावर्षीचा उन्हाळा तीव्र जाणवत आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्याही उकाड्याने कहर गाठला असून उन्हाच्या तीव्र झळांनी अंगाची लाहीलाही होत आहे. या पार्श्‍वभूमीवर उकाड्याने कसे हैराण केले आहे, याचीच सर्वत्र चर्चा आहे. यंदा कधी नाही तो सातार्‍याचा पारा 42 अंश ओलांडून गेला आहे. अशा भीषण उन्हाळ्याचा मात्र, समाजातील सर्वच घटकांवर परिणाम होऊ  लागला आहे.  मात्र, ज्या कष्टकर्‍यांच्या घरात रोजगार केल्याशिवाय चूल पेटणार नाही अशांना मात्र या भर उन्हातही राबण्याशिवाय पर्याय नाही. या कष्टकर्‍यांची उन्हातान्हात वणवण सुरु आहे. कारखान्यांत काम करणारे, शेतात राबणारे, रस्त्यांच्या कामांवर मोलमजुरी करणारे, भंगार गोळा करुन उदरनिर्वाह करणारे असे कितीतरी कष्टकरी जगणं असह्य करणार्‍या तीव्र उन्हाळ्यात संघर्ष करत आहेत. 

राब राब राबल्यानंतर कष्टकर्‍यांना आपल्या झोपडीत परतल्यानंतरही चुलीच्या धुरातच स्वत:ला कोंडून घ्यावे लागते. दिवसभर भर उन्हात राबल्यानंतर संध्याकाळी डोक्यावर ऊन नाही एवढाच काय तो या मंडळींना दिलासा आहे. उन्हाच्या झळा मजुरांना तर सोसाव्या लागतातच पण त्यांची चिमुरडीही उन्हातान्हातच खेळताना दिसत आहेत. या झळा सार्‍या कुटुंबालाच सहन कराव्या लागत आहेत. 

पावसाळ्यामध्ये वीट भट्ट्यांचे काम बंद असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातच या कामाची मोठी लगबग सुरु असते. चिखल मातीत राबणार्‍या या मजुरांना उन्हाच्या झळांसोबत वीट भट्टीची उष्णता आणि धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. अनेक लेकुरवाळ्या आपल्या चिमुरड्यांना झाडाच्या सावलीत ठेवून अशा ठिकाणी राबताना दिसून येतात. 

अनेक ठिकाणी  रस्त्यांची कामे सुरु असतात. उन्हाळ्यात रोजंदारीवर विहिरीतील गाळ काढणे, विहिरींची खोली वाढवणे, नव्या विहिरींची खुदाई करणे अशीही कष्टाची कामे सुरु असतात. या कामावरही पुरुष व महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. तीव्र उन्हाळ्यामुळे या कामावरील कामगारांनाही अधिक श्रम पडत आहेत. याशिवाय मंडप उभारणी, रस्त्यावरील विक्रेते, शेतमजूर,  गवंडी कामगार यांनाही उन्हाची पर्वा न करता पोटासाठी राबावे लागत आहे.