Sat, Jun 06, 2020 00:59होमपेज › Satara › कराडात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ

कराडात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ

Published On: Oct 02 2019 1:59AM | Last Updated: Oct 02 2019 12:36AM
कराड : प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ बनली आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील हे रयत संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर 1985 पर्यंत स्व. यशवतंराव मोहिते यांनी काँग्रेसचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तर 1985 पासून 2014 पर्यंत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने     तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना डावलत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली होती.

या निवडणुकीत विलासराव पाटील - उंडाळकर यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे अपक्ष विलासराव पाटील-उंडाळकर, भाजपाचे ना. डॉ. अतुल भोसले आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या जोरदार संघर्ष झाला होता. सध्यस्थितीत गेल्या चार दिवसांपासून आमदार पृथ्वीराज चव्हाण हे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरूद्ध सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळेच काँग्रेसतंर्गत उंडाळकर गट आणि पृथ्वीराज चव्हाण गटात मनोमिलन होईल, अशी शक्यताही निर्माण झाली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. तसेच ते स्वतः या विषयावर सोनिया गांधीसह काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते. मात्र स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यास पहिल्यापासून इच्छुक नव्हते. कार्यकर्त्यांनीही कराड दक्षिणमधूनच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. अखेर मंगळवारी सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमताने माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा निवडणूक लढवणार, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या कालावधीत सर्व शक्यता गृहीत धरून विलासराव पाटील - उंडाळकर गटाकडून जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना रयत संघटनेच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत उंडाळकर गट निवडणूक रिंगणात असणार असल्याचेच स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत अ‍ॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. त्यामुळेच या सर्व पार्श्‍वभूमीवर आता कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

दक्षिणेतील दिग्गजांचे उद्या शक्‍तिप्रदर्शन...

भाजप महायुतीचे उमेदवार ना. डॉ. अतुल भोसले हे गुरुवार, 3 ऑक्टोबरला शक्‍तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर करत कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तर अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हेही याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.