Fri, Jun 05, 2020 10:32होमपेज › Satara › राष्ट्रवादीच्या यादीमध्ये फलटणमधून दीपक चव्हाण

राष्ट्रवादीच्या यादीमध्ये फलटणमधून दीपक चव्हाण

Published On: Oct 03 2019 2:16AM | Last Updated: Oct 03 2019 12:25AM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी बर्‍याच प्रतीक्षेनंतर बुधवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सस्पेन्स भूमिका असलेले विधान परिषद सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच राष्ट्रवादीने बुधवारी रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये सातार्‍यातून दीपक पवार, वाईतून मकरंद पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, पाटणमधून सत्यजित पाटणकर, कोरेगावमधून शशिकांत शिंदे तर फलटणमधून दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे ना. रामराजे ना. निंबाळकर राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबत रामराजे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. त्यामुळे ऐनवेळी रामराजे निर्णय बदलणार का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.