Fri, Jun 05, 2020 13:02होमपेज › Satara › काँग्रेसच्या पहिल्या यादीतून ‘पंजा’ गायब

काँग्रेसच्या पहिल्या यादीतून ‘पंजा’ गायब

Published On: Sep 30 2019 1:53AM | Last Updated: Sep 29 2019 11:36PM
सातारा : प्रतिनिधी

एकेकाळी काँग्रेस विचारसरणीचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात या पक्षाला बाका परिस्थितीतून वाटचाल करावी लागत आहे. या विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये केवळ कराड दक्षिणवरच काँग्रेसला समाधान मानावे लागत असताना काँग्रेसने रविवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतून सातारा जिल्ह्यातील ‘हाताचा पंजा’च गायब झाला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या या जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ काँग्रेसवर आल्याचे चित्र दिसत आहे.

सातारा जिल्हा एकेकाळी काँग्रेस विचारसरणीचा पुरस्कर्ता ठरला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पहाडी नेतृत्व या जिल्ह्याने काँग्रेसला दिले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपदही  संभाळले आहे. असे असताना या सातारा जिल्ह्यात काँग्रेसला आपले आस्तित्व टिकवताना नाकीनऊ आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा नेतृत्वात बदल करावा लागला. फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली.

मात्र, अवघ्या काही महिन्यातच त्यांनी काँग्रेसला ‘बाय-बाय’ करीत भाजपमध्ये प्रवेश करून माढ्यातून खासदारकीही जिंकली. पाठोपाठ वाईचे माजी आमदार मदन भोसले,  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. जयकुमार गोरे, पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक  आ. आनंदराव पाटील यांचा मुलगा व पुतण्या यांनीही काँग्रेसला धक्के देत हाती कमळ घेतले. एक एकजण पक्ष सोडून जाऊ लागला.  

काँग्रेसवर अशी केविलवाणी अवस्था ओढवली असून, सद्य:स्थितीत हा पक्ष जिल्हा नेतृत्वाविनाच धडपडताना दिसत आहे. विधानसभेसाठी कराड दक्षिण  वगळता एकाही मतदारसंघात काँग्रेसची ताकद  दिसत नाही. येथील उमेदवारीसाठीही पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र  अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा पोट-निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

रविवारी  काँग्रेसने आपली पहिली यादी राजधानी दिल्‍लीतून जाहीर केली. मात्र त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाही उमदेवाराची घोषणा झालेली नाही.त्यामुळे पहिल्या यादीतून तरी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा ‘पंजा’ गायब झाल्याचेच दिसून आले. त्यामुळे आगामी  घडामोडींकडे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.