Tue, Apr 23, 2019 09:53होमपेज › Satara › ज्येष्ठ साहित्यिक अनिल  कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक अनिल  कुलकर्णी यांचे निधन

Published On: Feb 08 2018 2:44PM | Last Updated: Feb 08 2018 2:44PMवाई : प्रतिनिधी 

ज्येष्ठ साहित्यिक,  लो. टिळक स्मारक संस्थेचे संचालक, विश्वकोश निर्मिती मंडळाचे ज्येष्ठ संपादक अनिल रघुनाथ कुलकर्णी (वय: ८१) यांचे आज दि. ८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. 

मुंबईत शिक्षण घेतलेल्या कुलकर्णी यांनी काही काळ रेल्वेमध्ये तसेच दादर येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांच्या शाळेत विख्यात अभिनेते नाना पाटेकर हे ‘अरʼ सरांचे विद्यार्थी होते. हे सर आम्हाला अभिमामाने सांगायचे. पुढे ते तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी मराठी विश्वकोश व वाई ही आपली कर्मभूमी मानली. मराठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून ते विसाव्या खंडापर्यंत सरांनी लेखन, संपादन ही जबाबदारी सांभाळली. निवृत्तीनंतरही त्यांनी संपादनकार्यात सेवा दिली.

अस्सल इंग्रजीचा अभ्यास असलेल्या सरांनी मराठी विश्वकोशात मराठी साहित्याबरोबरच व जागतिक साहित्य व साहित्यिक, धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या विषयांचे अभ्यासू व नेमके लेखन केले.  आशयपूर्ण मांडणी आणि सारभूत व प्रमाणभूत विवेचन हे सरांच्या लेखांचे वैशिष्ट्य. त्यांनी लिहिलेल्या विठोबा, विश्वकोश या मराठी विश्वकोशातील नोंदी याची प्रचिती देतात. अशा शेकडो नोंदी त्यांनी मराठी विश्वकोशासाठी लिहिल्या. मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांच्यासह मे. पुं. रेगे, रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड यांच्यासमवेत त्यांनी विश्वकोशाचे संपादनकार्य केले. २०११ पासून आमचा सरांशी प्रत्यक्ष परिचय झाला आणि बहुमोल मार्गदर्शन लाभले. सतत स्मितहास्य, मनमिळाऊ वृत्ती आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या मतांचा आदर करून समजावून घेण्याची सरांची भूमिका नेहमीच राहिली. 

सॉलिटरी क्रिपर्स, ऐलतीर पैलतीर, सांजसूर, तळ्याकाठच्या सावल्या आणि अलीकडेच प्रकाशित झालेला कांतार हे त्यांचे  प्रसिद्ध कथासंग्रह. त्यांच्या तळ्याकाठच्या सावल्या या कथासंग्रहास २००९मध्ये कथा विभागात महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. तसेच सिटी ऑफ जॉय या त्यांनी अनुवादित केलेल्या साहित्यकृतीस महाराष्ट्र साहित्य परिषद आणि रोटरी क्लब, पुणे यांनी गौरविले होते. वाईतील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेशी सरांचा घनिष्ठ संबंध. अखेरपर्यंत ते या संस्थेशी व संस्थेच्या विविध उपक्रमाशी निगडीत राहिले. अंत्यविधी आज दुपारी 3 वाजता भीमकुंड आळी, वाई स्मशानभूमीत होणार आहे.