होमपेज › Satara › शिक्षक असल्याचा अभिमान, गर्व बाळगा

शिक्षक असल्याचा अभिमान, गर्व बाळगा

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:09AMकराड : प्रतिनिधी

सुसंस्कृत भावी पिढी तयार करण्याचे सर्वात महत्वपूर्ण काम शिक्षक करीत आहेत. त्यामुळे हे भाग्योदयाचे काम करणार्‍या शिक्षकांनी अभिमानाने सांगितले पाहीजे, की मी एक शिक्षक आहे,  असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले. 

कराड पंचायत समितीकडून आयोजीत शिक्षण महोत्सवातंर्गत आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते. सातारा जिल्हा परिषदेचे कृषि समिती सभापती मनोज पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, डॉ. विश्‍वास मेहेंदळे, सभापती शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, गटशिक्षणाधिकारी विश्‍वनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हंकारे म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने शिकवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना काय पाहिजे? याची जाणीव ठेवून त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्ञान रचनावाद हसत खेळत कसा राबवावा, याचे अत्यंत सहज असे मार्गदर्शन यावेळी वसंत हंकारे यांनी केले. 

मनोज पवार यांनी शिक्षण महोत्सवाला शुभेच्छा देऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे यांनी केले. यावेळी रमेश चव्हाण, प्रणव काटे, शरद पोळ, चंद्रकांत मदने यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य, शिक्षणविस्तार अधिकारी चंद्रकांत निकम, जमिला मुलाणी सर्व केंद्रप्रमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन बाळकृष्ण थोरात यांनी केले. तर आभार गटशिक्षणाधिकारी विश्‍वनाथ गायकवाड यांनी मानले.