होमपेज › Satara › लोणंद नगरीत लोटला वैष्णवजनांचा मेळा 

लोणंद नगरीत लोटला वैष्णवजनांचा मेळा 

Published On: Jul 13 2018 9:47PM | Last Updated: Jul 13 2018 9:47PMलोणंद : शशिकांत जाधव 

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करीत आळंदीहून पंढरीकडे विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्यास भव्य व विशाल रूप देणार्‍या पुण्यवान हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, ‘माऊली, माऊली, माऊली’च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या पात्रात अभ्यंगस्नान घालण्यात आले. यावेळी पावसाची जोरदार सर आली, त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने जलधारांचा अभिषेक करीतच माऊलींचे नीरा स्नान झाले. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकरी व भाविकांनी नीरा नदीच्या दोन्ही तीरांबरोबरच दोन्ही पुलांवर मोठी गर्दी केली होती. 

माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सात मुक्‍कामानंतर शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास वाल्हे येथून प्रस्थान ठेवले. पिंपरे येथील न्याहरी उरकून पालखी सोहळा नीरा नदीच्या तीरावर दुपारच्या विसाव्यासाठी  विसावला.पलीकडच्या तीरावर पुणे जिल्हा तर अलीकडच्या तीरावर सातारा जिल्हा, अशा स्थितीत नदीच्या दोन्ही तीरांबरोबरच नीरा नदीच्या पात्रातही वारकरी व भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. सकाळपासून वातावरणात उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. जसजसे घड्याळ्याचे काटे पुढे सरकत होते, तशी सर्वांचीच उत्सुकता वाढत चालली होती. तीन भोंगे झाल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याने नीरा येथून प्रस्थान ठेवले.

निरा भिवरा पडता दृष्टी । 
स्नान करिता शुद्ध दृष्टी l
अंती ते वैकुंठ प्राप्ती । 
ऐसे परम श्रेष्ठी बोलिला

रथापुढील सत्तावीस   दिंड्या पुढे गेल्यानंतर माऊलींच्या पादुका ठेवलेला रथ नीरा नदीच्या जुन्या पुलावरुन सातारा बाजूच्या तीरावर येऊन थांबला. नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला सातारा पोलिसांनी दोरखंड घेऊन कडे तयार केले होते. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवरील दत्त घाटावर नीरा स्नान घालण्यासाठी रथातून बाहेर काढून    पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख  अ‍ॅड. विकास ढगे पाटील आदींनी हातात घेतल्या. यावेळी नदीवरील पूल ते दत्त मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नीरा नदीत वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने दत घाटावर माऊलींच्या पादुकांना ‘माऊली, माऊली, माऊली’ च्या जयघोषात नीरा स्नानासाठी नेण्यात आले. भर पावसात  हा सोहळा पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही तीरावर व दोन्ही पुलांवर वारकरी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माऊलींच्या पादुकांना अभ्यंग स्नान घातल्यानंतर पुन्हा रथात ठेवण्यात  आल्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला.

दुपारी सव्वादोनच्या सुमारास पालखी सोहळ्याने टोल नाक्याजवळ पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सोहळ्याचे जोरदार उत्साही वातावरणात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी आ. मकरंद पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक -निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,  कृषी सभापती मनोज पवार, राजेश पवार , शिवाजी सर्वगोड, वनिता मोरे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार,  प्रांत अस्मिता मोरे, तहसीलदार विवेक जाधव, पोलिस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, खंडाळा पं. स. सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्‍विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव,  जि.प. सदस्या  सौ. दिपाली साळुंखे, उदय कबुले, गटविकास अधिकारी दीपा बापट, सपोनि गिरीश दिघावकर, हणमंतराव साळुंखे, राहुल घाडगे, डॉ. नितीन सावंत, गजेंद्र मुसळे, संभाजी घाडगे, विजय धायगुडे, हरिश्‍चंद्र माने आदी मान्यवरांनी पुष्पहार व पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

सातारा जिल्ह्याच्या वतीने माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत झाल्यानंतर सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. पाडेगावपासून माऊलींचा पालखी सोहळा लोणंदकडे येताना पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव कॅनॉल, पाडेगाव पाटी, बाळू पाटलाची वाडी, या ठिकाणी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पाडेगाव ते लोणंद असे सुमारे सात किलोमीटरचे अंतर अडीच तासांत पार करून माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी लोणंद नगरीत दाखल झाला.

पालखी सोहळा जरी दुपारी सातारा जिल्ह्यात आला असला तरी पहाटेपासूनच वारकरी व दिंड्यांचे ट्रक लोणंदकडे मार्गस्थ झाले होते. त्यामुळे पाडेगाव ते लोणंद हा रस्ता सकाळपासूनच वारकर्‍यांनी फुलून गेला होता. अनेक ठिकाणी पंगती बसल्या होत्या तर अनेकजण झाडाखाली वामकुक्षी घेत होते. जसे जमेल तसे अंतर कमी करीत वारकरी चालत होते. त्यामुळे लोणंदकडे जाणारा रस्ता ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली,  ज्ञानोबा माऊलींच्या गजराने निनादून गेला होता. माऊलींचा लोणंद नगरीत एकच मुक्‍काम असल्याने भक्‍तीचा महापूर ओसंडून वाहून माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे.

नीरा घाटावर तीर्थक्षेत्र आराखड्यातून सुविधा

गतवर्षी शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र आराखड्यातून माऊलींच्या स्नानासाठी घाटावर खास सोय करण्यात आली होती तर सिमेंटचा रस्ता, घाटावर पायर्‍या आदी सुविधा केल्या आहेत. माऊलींच्या पादुकांना गतवर्षीप्रमाणे या वर्षीही नियोजित जागी स्नान न घालता त्याच्या अलीकडे सुमारे वीस- तीस फूट अंतरावर स्नान घालण्यासाठी पादुका नीरा नदीच्या पात्रात नेण्यात आल्या. यावेळी माऊली, माऊली, माऊलीच्या जयघोषात नीरा स्नान घालण्यात आले. यावेळी जोरदार पावसाची सर आली. त्यामुळे वरूणराजाने एकप्रकारे जलधारांचा अभिषेकच केल्याचे चित्र पहावयास मिळाले तर वारकर्‍यांनी पाणी वर उडवून आनंद व्यक्‍त केला.