होमपेज › Satara › बेकारी उघड्यावर झोपते..!

बेकारी उघड्यावर झोपते..!

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 14 2018 8:29PMसातारा : विठ्ठल हेेंद्रे

अवकाशात झेपावण्याचे स्वप्न खुणावणार्‍या तब्बल 22 जिल्ह्यातील हजारो नवजवानांची पावले सातार्‍यात उतरली असून रविवारी रात्री तमाम सातारकरांनी बेकारी उघड्यावर कशी झोपते, याची दाहकता यानिमित्ताने अनुभवली. एअरफोर्स भरतीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या नवजवानांनी भरतीची पहिली रात्र अक्षरश: फुटपाथवर, रस्त्याकडेला अन् मिळेल त्या मोकळ्या जागेत मच्छर व डासांसोबत काढली. फळ विक्रीचे गाडे अन् गवतावरही ते विसावले. काळ्याकुट्ट अंधारात उद्याच्या उज्वल करिअरचा प्रकाश शोधत पहुडलेल्या या नवजवानांचं विदारक वास्तव विसावा नाका व सैनिक स्कूल मैदान परिसरात रविवारी रात्री पहायला मिळालं. घरुन आणलेल्या डब्यातील कालवणही विटल्याने अनेकांनी तर उपाशीपोटी रात्र काढली. बेकारी काय चिझ असते, हे उघड्या डोळ्यांनी अनेकांनी पाहिलं.

अनेक युवक प्रथमच सातार्‍यात

सातारा शहरात सोमवारपासून तीन दिवसांकरता एअरफोर्सच्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एअरफोर्स भरतीची जाहिरात सुटल्यानंतर त्याला राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून प्रतिसाद मिळाला. 

ही भरती विसावा नाका परिसरातील सैनिक स्कूल येथील मैदानावर होत आहे. सोमवारी प्रत्यक्षात भरतीची प्रक्रिया सुरु होणार असली तरी रविवारी दुपारपासून या भरतीसाठी येणार्‍या उमेदवारांची अक्षरश: रीघ लागली. 

हजारो उमेदवारांची पावले सातार्‍यात उतरल्याने सैनिक स्कूल परिसर फुलून गेला. राज्याच्या चारही टोकापासून एअरफोर्सच्या भरतीसाठी उमेदवार येत असल्याने बेरोजगारीची दाहकता किती भीषण आहे, याची झलक रविवारीच सातारकरांना अनुभवयास आली. 

भरतीसाठी आलेल्या उमेदवारांपैकी 90 टक्के उमेदवार प्रथमच सातार्‍यात आले आहेत. यामुळे सातारची अनेकांना माहिती नसल्यामुळे नेमके ठिकाण सापडण्यापासून अनेकांचा गोंधळ उडाला. 
मजल दरमजल करत उमेदवार सैनिक स्कूल व मैदान परिसरात पोहचत होते. प्राथमिक माहिती घेण्यासाठी त्यांची झुंबड उडत होती.

या भरतीसाठी आलेल्या सर्वच उमेदवारांना उद्याच्या उज्ज्वल भविष्याची चिंता लागून राहिली होती. त्यांच्या चेहर्‍यावरील भाव त्याची प्रचिती देत होते. या युवकांना करिअरच्या द‍ृष्टीने अलर्ट केल्याचेही निदर्शनास आले. 

सातारच्या शेख यांच्यामुळे भरतीचे आयोजन

सातारामध्ये गेल्या अनेक वर्षामधून एअरफोर्स भरती होत आहे. याअगोदर सुमारे 10 वर्षापूर्वी एअरफोर्सची भरती झाली असल्याची माहिती समोर येत आहेे. सातार्‍यातील एअरफोर्स भरतीच्या आयोजनामध्ये एका सातारकराचा मोठा रोल असल्याचेही समोर आले आहे. शेख नामक गृहस्थ एअरफोर्समध्ये कार्यरत होते. आपल्याप्रमाणेच सातारकर युवकांना सातार्‍यातच एअरफोर्स भरतीचे व्यासपीठ मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेख यांच्यामुळेच सातार्‍यात एअरफोर्स भरतीचे आयोजन झाले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सैनिक स्कूल परिसरही पडला अपुरा...

हजारो बेरोजगार उमेदवारांमुळे सैनिक स्कूल परिसराची जागा अपुरी पडू लागली. रविवारी रात्री 7 वाजल्यानंतर अवघा परिसर या युवकांनी व्यापून टाकला. ही मुले जागा मिळेल तेथे अंथरुन टाकून विसावा घेऊ लागली. उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने हा घोळका पुढे बाहेर निघून थेट झेडपी चौकातील फुटपाथावर अंथरुन टाकून पसरला. 
 दुसरीकडे झोपण्यासाठी जागाच नसल्याने झेडपी चौकातून सुरू झालेली रांग तशीच पुढे चक्‍क विसावा नाक्यापर्यंत गेली. त्यांना फुटपाथदेखील कमी पडून लागल्याने कोणी गाळ्याबाहेर, कोणी गवतावर तर अनेकांनी फळे-भाजी विक्री करणार्‍या गाड्यांमध्येच ताणून दिली. बेकार युवकांचे हे भीषण वास्तव मनाला डागण्या देणारं होतं. 

उकाड्यामुळे डब्यातील भाजी विटली; अनेकांची झाली उपासमार...

रविवारी रात्री उशिरापर्यंत भरतीसाठी उमेदवार  येतच होते. अनेकांचा दिवसभर एसटी, ट्रॅव्हल्स, ट्रकने प्रवास झाल्याने सातार्‍यात पाऊल टाकताच सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र अनेक उमेदवारांना वाईट अनुभवही आले. दिवसभर जे प्रवासात होेते व रात्री 10 नंतर जे सातार्‍यात आले त्यांना जेवण करता आले नाही. 

हॉटेल बंद झाल्याने अनेकांची उपासमार झाली. बहुतेकांनी जेवण सोबत आणले होेते मात्र उन्हाच्या तडाक्यामुळे आणलेली भाजी खराब झाली तर त्यामुळे चपातीही खाता आली नाही. उपाशीपोटी झोपण्याची वेळ आल्याने अनेकांचे हाल झाले.

विसावा नाका परिसरात अस्वच्छता असल्याने डासांचा कमालीचा प्रादुर्भाव झालेला आहे. अंथरुणाची पुरेेसी सोय नसल्याने व त्यातच डासांची खैरात असल्याने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या झोपेचेही खोबरे झाले. 

अनेकांनी मन मारुन तशीच ताणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. झोपण्याची गैरसोय, डासांचे साम्राज्य, यामुळे बहुतेक उमेदवार रात्री उशिरापर्यंत गप्पा-टप्पा मारत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होेते.

सातारा पोलिसांचाही बंदोबस्त तैनात
 एअरफोर्स भरतीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार सातार्‍यात आल्याने सातारा पोलिस दलही अलर्ट झाले होते. 
 शहर पोलिसांचाही सैनिक स्कूल परिसरात बंदोबस्त तैनात होता. रात्री उशीरापर्यंत कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ नये.
 भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या साहित्याची चोरी होऊ नये, यासाठी पोलिसांची रात्रीची गस्तही वाढवण्यात आली होती.                                                                                         सातारा- कोरेगाव रस्त्यावर फुटपाथवर मुले झोपल्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनांवर पोलिसांचे विशेष लक्ष होते. पोलिसांनी या युवकांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले.