Wed, May 22, 2019 17:08होमपेज › Satara › संशोधनासाठी भूगर्भात बोअरवेल

संशोधनासाठी भूगर्भात बोअरवेल

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 8:35PM

बुकमार्क करा

कराड : चंद्रजीत पाटील

महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना-वारणा परिसरात होणार्‍या भूकंपावर संशोधन करण्यासाठी गोठणे (ता. पाटण) येथे भूगर्भात सुमारे तीन हजार मीटर बोअरवेल खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे 6 महिन्यात हे काम पूर्ण झाले आहे. पृथ्वी विद्यान मंत्रालयातंर्गत केंद्र सरकारच्या कराड येथील वेधछिद्र भूभौतिक संशोधन प्रयोगशाळेने हे काम पूर्णत्वाकडे नेले असून याद्वारे आता कोयना धरण परिसरात भूकंप होण्यापूर्वी? भूकंपावेळी आणि भूकंपानंतर भूगर्भात काय हालचाली होतात? भूकंपाचे नेमके कारण काय? यावर संशोधन सुरू करण्यात आले आहे.

1962 साली कोयना धरणाच्या निर्मितीनंतर कोयना धरण परिसरात गेल्या 50 वर्षात 1 लाखाहून अधिक भूकंप झाले आहेत. यापैकी 11 डिसेंबर 1967 साली 6.3 तीव्रतेचा झालेला भूकंप सर्वाधिक तीव्रतेचा होता. जगात एखाद्या धरण परिसरात नोंदवण्यात आलेला हा सर्वाधिक तीव्रतेचा हा भूकंप होता. याशिवाय 5 आणि त्यापेक्षा अधिक रिश्टर स्केल तीव्रतेचे 22, 4 आणि त्याहून अधिक तीव्रतेचे सुमारे 200 भूकंप नोंदवण्यात आले आहेत. 

त्यामुळे भूकंपाची कारणे शोधण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील गोठणे गावाजवळील पठारावर 3 हजार मीटरचे बोअरवेल काढण्याचे काम डिसेंबर 2016 मध्ये हाती घेण्यात आले होेते. हे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या बोअरवेलमध्ये 1 हजार 500 मीटर ते 3 हजार मीटर या दरम्यान पृथ्वीच्या भूगर्भातील सात वेगवेगळ्या स्तरांचे नमुने घेण्यात आले आहेत. या सर्व स्तरांचा प्रयोगशाळेत अभ्यासही सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे खडकाळ भूगर्भिक परिस्थितीमध्ये काढण्यात आलेले देशातील सर्वांत जास्त खोल बोअरवेल म्हणूनही या कामाची ओळख आहे.

गोठणेे परिसरात सध्यस्थितीत 3 हजार मीटर म्हणजेच 3 किलोमीटर भूगर्भात बोअरवेल काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. याद्वारे मिळणार्‍या माहितीचा आधार घेत येत्या दोन ते तीन वर्षात 5 ते 7 किलोमीटरपर्यंत बोअरवेल काढण्यात येणार असून याठिकाणी भूकंपप्रवण क्षेत्र प्रथमच वेधशाळा स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

या बोअरवेलच्या माध्यमातून कोयना धरण परिसरातील भूकंपाचा अभ्यास, संशोधन करण्याबरोबर महत्त्वाची माहितीही मिळणार असून गेल्या 50 वर्षात हे शक्य झालेले नाही. भूकंप होण्यापूर्वी होणार्‍या हालचाली? भूकंपावेळी होणार्‍या हालचाली? आणि भूकंपानंतर होणार्‍या हालचाली? याचा आता सखोल अभ्यास आणि त्यावर संशोधन केले जाणार असून एक सिसमोमीटर (भूकंप लेखन यंत्र ) नेटवर्क स्थापन करण्याचीही योजना आहे.

या सिसमोमीटर नेटवर्क आणि बोअरवेलच्या माध्यमातून भूकंपाबाबत मिळणारी माहिती यांचा आधार घेत भूकंप वेधशाळा स्थापन केली जाणार आहे. या वेधशाळेद्वारे भूकंपप्रवण क्षेत्रात भौगोलिक आणि रासायनिक गुणांमध्ये होणार्‍या परिवर्तनावर लक्ष ठेवण्याबरोबर त्याचे विश्‍लेषण करणे सहजशक्य होणार आहे. त्यामुळेच या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे भूकंप निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण माहिती, ज्ञान मिळण्याची शक्यता असून केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ही एक मोठी उत्तुंग कामगिरी ठरणार आहे.