Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Satara › संशयिताच्या घरावर जमावाचा हल्ला

संशयिताच्या घरावर जमावाचा हल्ला

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:56PMउंडाळे : प्रतिनिधी

येणपे, ता. कराड येथे महिलेचा बलात्कार करून खून केल्याच्या घटनेचे तीव्र प्रडसाद गुरुवारी महिलेच्या रक्षाविसर्जना दिवशी उमटले. संशयित आरोपीच्या घरासह इतर घरांवर जमावाने दगडफेक केली. या हल्ल्यात घराची व घरासमोर लावलेल्या दुचाकी, चारचाकी, वाहनांसह जेसीबी व संसारोपयोगी साहित्याची मोठी मोडतोड झाली. यामध्ये दहा जण जखमी झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून गावामध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

येणपे येथील महिलेचा बलात्कार     करून मंगळवारी खून झाल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्याचवेळी ग्रामसभा घेऊन आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करून आरोपींना शिक्षा होईपर्यंत गावात सण, समारंभ साजरे न करणे, निवडणुकांवर बहिष्कार असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत केले व कारवाईचे आश्‍वासन दिले. तरीही गावातील वातावरण तणावपूर्ण होते. आज संबंधित महिलेच्या रक्षाविसर्जनावेळी जमाव आक्रमक झाला.

सकाळी महिलेच्या घरासमोर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना गावात थारा नको आणि गावच्या गायरान जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ काढावे, यासाठी ग्रामसभेत ठराव घेतल्याशिवाय रक्षाविसर्जन करणार नाही, अशी भूमिका घेतली. संतप्त जमावाने संशयित आरोपी व समाजाच्या अन्य घरांवर तुफानी दगड फेक करीत हल्ला केला. या हल्ल्यात दहा जण जखमी झाले.

यामध्ये संशयितांच्या घरासमोर लावलेली दुचाकी फोडली. शिवाय दारासमोर असलेले गवताचे छतही उचकटून टाकले. तर दुसर्‍या संशयिताच्या घरावरील कौलांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. आरोपीच्या शेजारी असलेल्या समाजातील घरावरही तुफान दगडफेक केली. त्याचवेळी त्यांच्या घरासमोर असलेल्या दुचाकी गाड्या, एक चारचाकी इंडिका कार, जेसीबीची मोडतोड करत घरावरही हल्ला केला. या हल्ल्यात घरातील साहित्य, दाराची मोडतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार, डीवायएसपी नवनाथ ढवळे, तालुका पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांसह पोलिस फौजफाटा तातडीने दाखल झाला. त्यांनी जमावाला शांत केले. हा प्रकार जवळजवळ एक ते दीड तास सुरु होता. यानंतर ग्रामस्थांची व प्रशासनाची बैठक होऊन महिलेचा रक्षाविसर्जन विधी दुपारी 1 वाजता पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडला.
येणपे राडा प्रकरणी पोलिसांनी तात्काळ दखल घेत जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करत बंदोबस्तात वाढ केली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.