Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Satara › कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचे बँकांमध्ये हेलपाटे

कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचे बँकांमध्ये हेलपाटे

Published On: Feb 10 2018 1:38AM | Last Updated: Feb 09 2018 10:42PMउंडाळे : वैभव पाटील

याद्या आल्या अन् याद्या गेल्या पण कर्जमाफीची रक्‍कम शेतकर्‍यांना अद्याप मिळाली नसल्याने कर्जमाफीसाठी शेतकरी विकास सेवा सोसायट्या व बँकेत हेलपाटे घालत आहेत. पण कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून सरकारविरोधी तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करून सहा महिने झाले तरी अद्याप बहुतांश शेतकर्‍यांना कर्जमाफीचा छदामही मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नाव आहे पण कर्जमाफी कधी होणार, याची वाट शेतकरी चातकाप्रमाणे पाहत आहेत.

राज्यातील 89 लाख शेतकर्‍यांना 34 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर शेतकरी वर्गाला काही प्रमाणात हायसे वाटले. पण कर्जमाफीत घातलेल्या अटी व शर्थीने शेतकरी मेटाकुटीस आला. तरीही शेतकर्‍यांनी आपल्या परीने आधुनिक पद्धतीचा स्वीकार करत माहिती भरली. माहितीनंतर राज्य सरकारने वेळकाढू धोरण घेत दिर्घ मुदतीने कर्जमाफीची यादी जाहीर केली. या याद्यांमध्ये अनेक त्रुटी राहिल्याने त्या परत मागवल्या. त्या त्रुटी संपल्यानंतर कर्जमाफीची नवीन यादी जाहीर केली. पुन्हा  सरकारला उपरती झाली व नव्याने पुन्हा कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांची माहिती मागविली.

ही यादी मागवताना सरकारने वंचित राहणारा शेतकरी नेमक्या कोणत्या निकषातून वंचित आहे याची कारणे मागविली. यातून काही अंशी शेतकरी नव्या यादीतून कर्जमाफीत येतील, असे चित्र होते, पण प्रत्यक्षात यापूर्वी जाहीर केलेल्या दोन ते तीन याद्यांमध्ये ज्या शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली त्यांना अद्यापही कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. कर्जमाफी मिळाली असे शेतकरी मोजकेच आहेत. एखाद्या गावात कर्जमाफी मिळालेले उर्वरित शेतकर्‍यांना आता कर्जमाफी होईल, नंतर होईल अशी फक्‍त आश्‍वासनांची ‘गाजरे’ दाखवली जात आहेत.

सरकार केवळ कर्जमाफीपेक्षा कागदपत्रांचाच खेळ करत असल्याने शेतकरी संतप्‍त झाला आहे. सहकारमंत्री  शेतकर्‍यांना बँकेत चौकशी करा, असे सांगतात. पण प्रत्यक्षात बँका व सोसायटीमध्ये हेलपाटे घातले पण कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफी झाली का, असे विचारल्यानंतर यादी तयार करण्याचे काम सुरु आहे, येवढेच उत्तर शेतकर्‍यांना  मिळत आहे.