Fri, Aug 23, 2019 21:25होमपेज › Satara › सातारा : भोंदूबाबाकडून भक्ताचा खून; दोघांना अटक (video)

सातारा : भोंदूबाबाकडून भक्ताचा खून; दोघांना अटक (video)

Published On: Feb 15 2018 1:58PM | Last Updated: Feb 15 2018 2:34PMसातारा : प्रतिनिधी 

कराड तालुक्यातील गायकवाडी येथील किशोर रामचंद्र गायकवाड(वय, २९) या युवकाचे चारचाकी गाडीसह आठ महिन्यापुर्वी चित्रपटातील कथेप्रमाणे अपहरण झाले होते. त्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून झाली होती. अखेर किशोरचा खून झाल्याचे निष्पन्न होऊन सांगली जिल्ह्यातील स्वयंघोषीत महाराज सर्जेराव यशवंत राजवंस-सावंत व त्याचे साथीदार सागर देसाई, राहुल शिंदे यांना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांची ७२ तास चौकशी केल्यानंतर किशोर गायकवाडच्या खुनाची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली. 

याबाबत माहिती अशी की, कराड तालुक्यातील गायकवाडवाडी येथील किशोर रामचंद्र गायकवाड याने व्यवसायासाठी संशयित आरोपी मुख्य सूत्रधार सर्जेराव यशवंत राजवंस-सावंत उर्फ महाराज, त्याचा मेव्हणा सागर देसाई, साथीदार राहुल शिंदे( तिघेही रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्याकडे ११ लाख रूपये दिले होते. व्यवसायात फायदा न झाल्यामुळे किशोर याने ११ लाख रूपये परत देण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी महाराज घरी नसताना त्याच्या पत्नीकडे जाऊन किशोर वारंवार पैशाची मागणी करून शिवीगाळ व दमदाटी करीत होता. यामुळेच महाराज व त्याच्या साथीदारांनी किशोर गायकवाडच्या खूनाचा कट रचला. 

खून केल्यानंतर पसरवला गैरसमज

पुर्वनियोजीत कटाप्रमाणे ८ जुलै २०१७ रोजी सुर्या ढाब्यामागे ‘राहुल हाईटस्’ या इमारतीमधील फ्लॅटमध्ये पैसे परत देण्याच्या बहाणा करून किशोरला बोलाविले. त्या ठिकाणी त्याच्याशी वाद केला. वाद चालू असतानाच गाडीच्या क्लच वायरने किशोरचा गळा आवळण्यात आला. त्यानंतर डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून करुन किशोरचा मृतदेह चारचाकी गाडीच्या डिकीमध्ये टाकून कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडच्या घनदाट जंगलात नेला. उंच कड्यावरून मृतदेह दरीत फेकून दिला. तसेच किशोरचा मोबाईल हँण्डसेट स्वत:जवळ ठेवला. त्यानंतर हॅण्डसेट पुणे, मुंबई परीसरात फिरवला आणि किशोर वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा गैरसमज पसरवला. 

किशोरच्याच गाडीतून फिरले

किशोरच्या खूनानंतर त्याच्याच गाडीतून पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी फिरले. त्यानंतर आकलूज येथे गाडी तशीच सोडून दिली.एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभणाऱ्या कथेप्रमाणे या खुनाचे रहस्य पोलिसांनी उलगडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि उंब्रज पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत या आठ महिन्यापुर्वीच्या खुनाला वाचा फोडली. यासाठी ७२ तास पोलीसांनी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर तपास अधिकार्‍यांसमोर आरोपींनी खूनाची कबुली दिली.