Fri, Apr 26, 2019 09:19होमपेज › Satara › कामे नाही केली तर मिशीच काय भुवयापण काढेन : उदयनराजे (Video)

कामे नाही केली तर मिशीच काय भुवयापण काढेन : उदयनराजे (Video)

Published On: Feb 03 2018 2:24PM | Last Updated: Feb 03 2018 3:26PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील झोपडपट्टीत राहणार्‍या गरीब नागरिकांसाठी झोपडपट्टी योजनेतून घरकूल दिले जात आहे.  ही योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करुन गरीबांना घरे उपलब्ध करुन दिली जातील. सातारकरांनी जेवढी असतील तेवढी कामे सांगावित. त्यांची कामे केली नाहीत तर मिशीसह भुवयापण काढेन, अशा शब्दात सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आश्‍वासन दिले.

सातारा नगरपालिकेच्यावतीने शहरात राबवण्यात आलेल्या एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी सुधार योजनेतून बांधण्यात आलेल्या 187 घरकुलांसाठी शाहू कलामंदिरमध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, सभागृह नेत्या सौ. स्मिता घोडके, नगसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, प्रतोद निशांत पाटील आदि उपस्थित होते. 
सातारा पालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांंमध्ये  एकूण 692 घरकुलांचे वाटप केले आहे. शनिवारी लक्ष्मीटेकडी झोपडपट्टीतील 110, कामाठीपुरा झोपडपट्टीतील 74, भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टीतील 4 अशा 187 घरकुलांचे वाटप खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

खा. उदयनराजे म्हणाले,  सातारकरांनी सहकार्य करुन यापुढेही आशीर्वाद आणि  प्रेम द्यावे. निश्‍चितपणे मी कुठेही कमी पडणार नाही. मी कमी  पण लोकहिताचे बोलतो. काही गोष्टी कशा सांगायच्या कळत नाही. ‘काय बाय सांगू... कसं गं सांगू... मलाच माझी वाटे लाज...’ या गाण्यासारखी अवस्था होते. कधी वाटतं की आपण महालात राहतो पण या गरीबांना साधं घरही मिळत नाही. शहरातील घरकुलांची कामे मी केली नाहीत तर लोकांवर अन्याय होईल. ‘जलमंदिर’ मोठे असून त्याठिकाणी भरपूर जागा आहे. लोकांनी याठिकाणी रहायला यावे. मनापासून सांगतो, मी कायम सातारकरांचा असून या  शब्दात कधीही बदल होणार नाही, असे  खा. उदयनराजे यांनी आश्‍वासित केले.

सौ. माधवी कदम म्हणाल्या, लाभार्थ्यांनी घरकूल योजनेत पैसे भरुन  घरकूल योजनेचा लाभ घ्यावा. एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी सुधार योजनेत गरिबांनी सहभागी व्हावे. या योजनेतून वंचित राहिलेल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ दिला जाईल. प्रास्तविक निशांत पाटील यांनी केले. 

यावेळी बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, उपअभियंता अनंत प्रभुणे, सुधीर चव्हाण, प्रदीप साबळे, धैर्यशील शिंदे उपस्थित होते.

व्हिडीओ : साई सावंत