Thu, Jul 18, 2019 22:06होमपेज › Satara › तर स्मारक का होऊ शकत नाही : उदयनराजे (Video)

तर स्मारक का होऊ शकत नाही : उदयनराजे (Video)

Published On: Feb 03 2018 2:57PM | Last Updated: Feb 03 2018 3:26PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात होणे अशक्य आहे, असे विधान केले होते. त्याचा शनिवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकतो तर स्मारक का होणार नाही? डोक्यातून नव्हे तर हृदयातून करायचे ठरवल्यास छत्रपतींचे स्मारक अरबी समुद्रात का होणार नाही? असे प्रत्युत्तर खा. उदयनराजे यांनी दिले. जिल्हा क्रीडा संकुलाजवळ होत असलेल्या छ. शिवाजी संग्रहालयाला खा. उदयनराजे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर बाहेर पडत असताना पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.

यावेळी त्यांना राज ठाकरे यांनी छ. शिवाजी महाराजांचे स्मारक बनणे अशक्य आहे, असे विधान केले होते त्यावर आपले मत काय? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कसे होऊ शकत नाही. मनात आणलं तर डोक्यातून नव्हे तर हृदयातून करायच ठरवलं तर शक्य आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकतो तर स्मारक का होणार नाही? लोकशाहीचे आपण सर्व राजे आहोत. जगात अनेक योध्दे होऊन गेले. मात्र, छ. शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते की त्यांनी जाती धर्माचा विचार केला नाही. जे इतर योध्दे विशिष्ट धर्माचे होते त्यांची प्रतिमा कुठेच दिसत नाही. परंतु, आजसुध्दा आपण छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा देव्हार्‍यात ठेवतो. हे कशाकरता? त्यांच्यावर लोकांचे प्रेम आहे म्हणूनच. त्यांच्या कार्याची इतरांशी तुलनाच होऊ शकत नाही. त्यांचे जतन करायचे नाही तर कुणाचे करायचे? असा सवाल उपस्थित केला.  छ. शिवाजी महाराज हे युवकांचे स्फूर्तीस्थान असून त्यांच्या कार्यातूनच अनेकजण प्रेरणा घेत असतात, असेही त्यांनी सांगितले. 

संग्रहालयासाठी 5 कोटींचा निधी मंजूर

छ. शिवाजी संग्रहालयासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी 10 कोटींचा निधी वाट्टेल त्या परिस्थितीत आणणार आहे. हे संग्रहालय युवकांचे स्फूर्तीकेंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढील शिवजयंतीपर्यंत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.