Wed, May 27, 2020 07:27होमपेज › Satara › उदयनराजेंचे शक्तीप्रदर्शन; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातार्‍यात महाविराट रॅली(Video)

सातार्‍यात उदयनराजेंसाठी जनसैलाब (Video)

Published On: Apr 02 2019 11:58AM | Last Updated: Apr 02 2019 11:06PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी राजधानी सातार्‍यात मंगळवारी जनसैलाब उसळला. महाविराट गर्दीच्या साक्षीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, आ.  आनंदराव पाटील, सत्यजित पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे अर्ज सादर केला.  

खा. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी मंगळवारी रॅलीचे आयोजन केले होते. खा. उदयनराजेंनी राजमाता श्री. छ. कल्पनराजे भोसले, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांच्यासोबत सकाळी भवानी मातेचे दर्शन घेतले. श्री. छ. प्रतापसिंह महाराज तथा दादा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी राजवाडा परिसरातील जवाहर बागेतील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  सनईच्या सुरात, ढोल-ताशांच्या दणदणाटात, तुतार्‍यांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत विराट जनसमुदायाच्या साक्षीने या रॅलीस सकाळी 11 वाजता श्रीफळ वाढवून गांधी मैदानापासून सुरुवात झाली. रॅलीत सुरुवातीला बँजो, त्यामागे महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या, त्यानंतर तुतारीवाल्यांचे पथक, कार्यकर्ते आणि त्यानंतर उदयनराजेंच्या वाहनाचा ताफा अशी रचना होती. 

‘एक नेता एक आवाज... उदयन महाराज, उदयन महाराज; उदयनराजे आगे बढो.. हम तुम्हारे साथ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा... विजय असो’, अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला.बँण्डवरील महाराष्ट्र गीताबरोबरच देशभक्‍तीपर गीते लावण्यात आली होती. पारंपरिक हलगी पथकाबरोबरच लमाण समाजातील  महिलांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआयचे कवाडे व गवई गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षाचे ध्वज घेवून या रॅलीत सहभागी झाले होते. गांधी मैदानावरुन रॅली मोती चौकात आल्यावर कार्यकर्त्यांचे गट रॅलीत मिसळण्यास सुरुवात झाली. यावेळी काही सातारकर नागरिकांनी उदयनराजेंना पुष्पहार घालून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.  रॅलीत प्रारंभी उदयनराजेंसमवेत आ. शिवेंद्रराजे, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील होते. जवाहर मुनौत चौकातून पुढे देवी चौकात येत असतानाच माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार हेही रॅलीत सहभागी झाले. जुनी पुरानी दुष्मनी विसरुन अजित पवार आणि उदयनराजे एकदिल झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्‍लोष केला. दोघेही एकाच गाडीमध्ये उभे राहून नागरिकांना अभिवादन करताना गर्दीनेही तोंडात बोटे घातली. याचवेळी आ. बाळासाहेब पाटील हेही सहभागी झाले. कमानी हौद चौकातून रॅली खालच्या रस्त्यावर येत असताना पोवईनाक्याकडून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचे विविध मतदारसंघातून जथ्येच्या जथ्ये येवून रॅलीत सहभागी होत होते. 

पोलिस मुख्यालयापासून रॅली पुढे आल्यावर पोवईनाक्यापासून 501 पाटीपर्यंत सुमारे 1 कि.मी.पर्यंत समर्थकांची गर्दी दिसत होती. या गर्दीत अबालवृध्द सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे येवून मिळत असल्याने रॅलीला महाविराट स्वरुप प्राप्‍त झाले. सातार्‍याचा पारा 40 अंशावर गेला असतानाही कार्यकर्ते रॅलीत बेभान होवून जल्‍लोष करत होते.  रॅली पोवईनाक्यावर येण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील हेही रॅलीत सामील झाले. रॅली पोवईनाक्यावरील शिवतीर्थावर आली त्यावेळी सातार्‍यात जनसैलाब उसळला होता. दुपारी ऊनाचा रट असतानाही गर्दी तस्सुभरही ढळली नाही. कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.  

पोवईनाक्यावर आल्यावर युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या सभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले. 

दरम्यान, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे खा. उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज सादर केला. उदयनराजेंनी तीन अर्ज भरले. त्यांना आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले हे सूचक आहेत. 

रॅलीत राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, श्रीमंत शिवाजीराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,  अ‍ॅड. नितीन भोसले, धैर्यशील कदम, विराज शिंदे, सारंग पाटील, अखिल भारतीय माथाडीचे कामगार नेते अविनाश रामिष्टे, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,  राजू भोसले, सुनील काटकर, बाळासाहेब भिलारे, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब बागवान,  अशोक सावंत, काका धुमाळ, संजय शिंदे, प्रताप शिंदे,   राजेंद्र यादव, हणमंतराव पवार, जयवंत पाटील, संग्राम बर्गे, रवी साळुंखे, ऋषिकांत शिंदे, अ‍ॅड. विजयराव कणसे, तेजस शिंदे, सौरभ शिंदे, प्रदीप विधाते, भिमराव पाटील, चंद्रकांत जाधव,  अ‍ॅड. डी. जी. बनकर, गीतांजली कदम, रंजना रावत, स्मिता घोडके, समृध्दी जाधव, किशोर शिंदे, अर्चना देशमुख, संमीद्रा जाधव, सुवर्णा पाटील, सुरेखा पाटील, रजनी पवार, धनश्री महाडिक, पंकज चव्हाण, अश्‍विनी पुजारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पृथ्वीराजांकडून मोदींची तुलना औरंगजेबाशी 

महाराष्ट्रात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार आणि अजित पवार ही जोडी औरंगजेबाच्या घोड्यांना जशी संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे त्याप्रमाणे दिसत आहे, अशा शेलक्या भाषेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचा सातार्‍यात पत्रकार परिषदेत समाचार घेतला. वर्धा येथे झालेल्या सभेत मोदींनी पवारांवर व्यक्‍तिगत टीका केली आहे. वस्तुत:, त्यांनी राष्ट्रीय प्रश्‍नांवर बोलणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी अनपेक्षितपणे शरद पवार यांची बाजू घेत मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.