Tue, Nov 20, 2018 21:43होमपेज › Satara › खासदार उदयनराजेंची ‘व्हॅलेंटाईन’ अदा

खासदार उदयनराजेंची ‘व्हॅलेंटाईन’ अदा

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 15 2018 1:58AMसातारा : प्रतिनिधी

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची सातार्‍यातील भिरकीट तरुणाईसाठी पर्वणीच असते. फेब्रुवारीतील त्यांचा ‘व्हॅलेंटाईन मूड’ सातार्‍यातील समस्त तरुणाईवर गारुड करत असतो. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्‍त आलेल्या खा. श्री. छ. उदयनराजेंनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना चक्क गुलाबांच्या फुलांनी गच्च भरलेला बुके देवून ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या  खास शुभेच्छा दिल्या. 

खा. उदयनराजे भोसले हे  छत्रपती शिवरायांच्या घराण्याचे थेट 13 वे वंशज आहेत तसेच भारतीय संसदेचे खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बलाढ्य नेते आहेत, सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचे टर्निंग पॉईंटही आहेत. मात्र, या सर्वांच्या पलिकडे उदयनराजे हे कमालीचे रसिक, कला, संगीतप्रेमी, नाट्यवेडे आहेत. त्यांची ही संगीताची, कलेची आवड सातत्याने उफाळून येत असते. उदयनराजेंचा स्वभावच तसा असल्याने तरुणाईला जे आवडतं ते उदयनराजे हमखास करुन दाखवतात.

फेब्रुवारी महिन्यात तर सातार्‍याची तरुणाई उदयनराजेंभोवती पिंगा घालत असते. फेब्रुवारी महिना सुरु झाला की ही तरुणाई उदयनराजेंना काळजात घेते. वर्षभर आम्ही तुमचे ऐकत असतो, फेब्रुवारीत तुम्ही आमचं ऐकायचं, असा अलिखित करारच झालेला उदयनराजे व सातारच्या तरुणांमध्ये  दिसत असतो. उदयनराजेंचा वाढदिवस असला की सातारची तरुणाई ऐकायला तयार नसते. त्यादिवशी फटाके फुटणारच, डीजे वाजणारच, 24 फेब्रुवारीपर्यंत वातावरण उदयनराजेमय होवून जाणारच, असाच माहोल सध्या सातार्‍यात आहे. 

पुढील आठवड्यात होत असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या जंगी नियोजनाची तयारी राजधानी सातार्‍यात आहे. वाढदिवसाचा शाही सोहळा साजरा करण्यासाठी कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत. या माहोलातच आणखी भर पडते ती उदयनराजेंचा रोमँटिक मूड! ‘व्हॅलेंटाईन डे’चा सप्‍ताह सर्वत्र गुलाबी रुपात दिसत असतो. उदयनराजे ‘व्हॅलेंटाईनच्या मूड’मध्ये राहून तरुण वर्गाच्या काळजाची धून छेडत असतात. त्यातच बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या खा. उदयनराजेंनी बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना गुलाबांच्या फुलांनी भरलेला बुके  देत ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या.