Thu, Feb 21, 2019 13:06होमपेज › Satara › उदयनराजेंचे प्रेम कधी-कधी ऊतू जाते : शिवेंद्रराजे 

उदयनराजेंचे प्रेम कधी-कधी ऊतू जाते : शिवेंद्रराजे 

Published On: Jun 13 2018 7:17PM | Last Updated: Jun 13 2018 7:17PMसातारा : प्रतिनिधी

लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्यापेक्षा सातार्‍यातील निवासस्थान असलेल्या शुक्रवार पेठेतून नगरसेवक म्हणून सातारा नगरपालिकेत निवडून जायला आवडेल, अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.  खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रेमाची अनेक रुपे सातारकरांनी पाहिली आहेत. कमी-जास्त प्रेम करणार्‍या उदयनराजेंचे प्रेम कधी-कधी ऊतूही जाते, असा टोला शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषदेत लगावला.


सातारा नगरपालिका कारभाराचा समाचार घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. विधानसभा लढवणार की लोकसभा? उदयनराजेंशी  त्यांच्या वाढदिवसानंतर संपर्क झाला का? रयत शिक्षण संस्थेवर तुम्हाला घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे, असे पत्रकारांनी विचारले असता शिवेंद्रराजे म्हणाले, ‘मी शुक्रवार पेठेतून नगरपालिकेत निवडून जायचा विचार करतोय. लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. सातारा-जावली मतदारसंघातच काम करणार आहे. उदयनराजेंच्या वाढदिवसानंतर त्यांचा फोन झाला नाही. शरद पवार यांच्यासोबत हॉटेल प्रीतीपर्यंतच सैन्य होतं. सर्व आमदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे. राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे ते कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. उदयनराजे रयत शिक्षण संस्थेवर मला घ्यावे म्हणत असले तरी त्यांच्या ओठात एक आणि पोटात दुसरेच असते. त्यांच्या प्रेमाची अनेक रुपे सातारकरांनी पाहिली आहेत. कमी-जास्त प्रेम करत असताना त्यांचे प्रेम कधी-कधी ऊतूपण जाते.’ रयत बाबात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले,  ‘रयतवर पवारसाहेब असल्याने त्याठिकाणी माझी आवश्यकता नाही. मी एबीआयटीमध्येच खूश आहे.’

दिल्लीतील वातावरण चांगले नसून सातार्‍यात लोकांना भेटता येते याचे समाधान आहे, असेही शिवेंद्रराजे म्हणाले. राजधानी महोत्सवाला सुपरस्टार अमिताभ बच्चन आले नाहीत, असे विचारले असताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, की अमिताभ बच्चन का आले नाहीत याचे कारण सांगायला मी अभिषेक बच्चन नाही. त्यांच्या न येण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी मुंबईला जावे लागेल.