Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Satara › ब्‍लॉग : खासदार उदयनराजेंची गोळाबेरीज सुरू 

ब्‍लॉग : खासदार उदयनराजेंची गोळाबेरीज सुरू 

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 22 2018 12:18PMसातारा : प्रतिनिधी

राजधानी सातार्‍यात दि. 24 फेब्रुवारी रोजी होणार्‍या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या शाही वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने गेले काही महिने अबोला असलेल्यांशी खा. उदयनराजेंनी गोळाबेरीज करायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आ. शिवेंद्रराजेंना कॉल केला तर मंगळवारी त्यांनी थेट विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सायंकाळी खा. उदयनराजे विकासनगर येथील लक्ष्मणराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन तात्यांना भेटले. 

दि. 24 फेब्रुवारी रोजी खा. उदयनराजेंचा वाढदिवस नेहमीपेक्षा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले हे हेवीवेट नेते उदयनराजेंच्या वाढदिवसाला हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. खा. उदयनराजेही ताकदीने आखाड्यात उतरले आहेत. विविध विकासकामांच्या भूमिपूजनांबरोबरच लोकसभेची हॅट्ट्रिक करण्याच्या द‍ृष्टीने उदयनराजेंची मोहीम सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावरील सभा ‘न भूतो न भविष्यती’ करण्याचा खा. उदयनराजेंचा विचार आहे. त्याद‍ृष्टीने त्यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांनी आ. शिवेंद्रराजेंना फोन लावला. शिवेंद्रराजेंनी वाढदिवस सोहळ्याला उपस्थित रहावेे, असा आग्रहही त्यांनी धरला. शिवेंद्रराजे व दोघांमध्ये चर्चा झाली. आता शिवेंद्रराजे जिल्हा परिषदेच्या मैदानावरील सोहळ्याला दिसतील का? याविषयी उत्सुकता आहे. 

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांचे नाव नव्हते. मात्र, खा. उदयनराजेंनी आपल्या समर्थकांना ही चूक दुरुस्त करायला लावली आणि पुन्हा नव्याने पत्रिका छापायला लावल्या. निमंत्रण पत्रिकेत आता ना. रामराजे ना. निंबाळकर यांचेही नाव झळकू लागले आहे. मंगळवारी खा. उदयनराजेंनी थेट रामराजेंनाही फोन लावला. घरगुती संबंध असल्याचे दाखलेही खा. उदयनराजेंनी दिल्याचे समजते. दोघांमध्ये फोनवरच चर्चा झाली. 
उदयनराजेंनी रामराजेंना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. रामराजे नेमके काय करणार? हेही व्यासपीठावरच दिसणार आहे. 

सायंकाळी उदयनराजेंनी तिसरी खेळी केली. त्यांनी थेट राष्ट्रवादीचे भिष्माचार्य लक्ष्मणराव पाटील यांचे निवासस्थान गाठले. लक्ष्मणतात्यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. विकासनगर येथे दोन नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. तात्यांना त्यांनी  कार्यक्रमाला येण्याचा आग्रह धरला. तात्यांनीही त्याला होकार दिला. 

जसजसी दि. 24 फेब्रुवारी जवळ येत आहे तसतसे राजकीय रंग वाढू लागले आहेत. खा. उदयनराजेंनी गोळाबेरीज करायला सुरूवात केली आहे. उदयनराजेेंच्या मुव्हमेंटला राष्ट्रवादी कसा प्रतिसाद देते यावर उदयनराजेंची पुढची चाल असणार आहे.