Fri, Mar 22, 2019 08:16होमपेज › Satara › यशाचे श्रेय सातारकरांना : खा. उदयनराजे 

यशाचे श्रेय सातारकरांना : खा. उदयनराजे 

Published On: May 30 2018 2:23AM | Last Updated: May 29 2018 11:51PMसातारा : प्रतिनिधी

मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न सुटला असून लवकरच वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यास सुरुवात होईल. राजकीयदृष्टया कुणी कितीही आडकाठी घातली तरी अखेर  सातारच्या लढावू बाण्याच्या निस्वार्थी प्रयत्नांना यश आले असून वैद्यकीय शिक्षण  घेणार्‍या पुढील पिढयांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचा  ठरणारा निर्णय झाला आहे, याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना.गिरिष महाजन यांचे आम्ही विशेष आभार मानतो, वैद्यकीय महाविद्यालयाच्या या यशाचे श्रेय आम्ही सर्व सातारकरांना  देतो, अशी प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहीजे याकरीता सर्वप्रथम आम्ही मागणी करुन पाठपुरावा केला होता. वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी करता 500 खाटांचे सलग्न रुग्णालय आवश्यक होते. त्याकरता जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेण्यात आले.  त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला गती मिळाली. दरम्यानच्या काळात वैद्यकीय  महाविद्यालय सातारा येथे शासनाने मंजूर केले परंतु जागेचा प्रश्‍न होता.  विद्यमान शासकीय रुग्णालयाची अपुरी जागा लक्षात घेता खावली येथील जागा प्रस्तावित केली गेली. तथापि खावली ते शासकीय रुग्णालयाचे अंतर पहाता, त्याऐवजी जलसंपदा विभागाची कृष्णानगर येथील जागा आम्ही सुचवली. ही जागा हस्तांतरण करण्यासाठी अनेकवेळा आम्ही पाठपुरावा केला. परंतु श्रेयवादाचे राजकारण आड येत असावे. तथापि आम्ही सातारी बाण्याचा सातत्याने पाठपुरावा सुरुच ठेवला. देवेंद्र फडणवीस यांची ज्या ज्या वेळी आमची भेट झाली त्या त्या वेळी आम्ही मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मांडला. ते सातार्‍यात आले तेव्हाही त्यांच्याकडे याबाबत आम्ही पाठपुरावा केला. त्याचवेळी त्यांनी आमच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिले होते.  वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा तिढा देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरिष महाजन यांनी सोडवताना, आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत, जलसंपदा विभागाची सुमारे 25 एकर जागा विनाअट आणि विनामुल्य तसेच कायमस्वरुपी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. येत्या दोन-एक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करुन, वैद्यकीय महाविद्यालयात सन  2021 ची  प्रवेश प्रक्रीया राबवण्याबाबत आमचे कसोशीचे प्रयत्न राहतील. त्यामुळे  मेडिकलला जाणार्‍या  विद्यार्थ्यांना अधिक संधीचे नवे दालन उपलब्ध होईल, याचे फार मोठे आत्मिक समाधान वाटते,  असेही खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.