होमपेज › Satara › उभे रिंगणाचा सोहळा..  साठवूनी पाहती डोळा..

उभे रिंगणाचा सोहळा..  साठवूनी पाहती डोळा..

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:35PMफलटण : यशवंत खलाटे   
माऊलींची  पावन वारी ।
निघालीये पंढरी नगरी ।
माऊली माऊली गजरी ।
भक्तजन ॥
     भक्तजन हरि नामे झिंग ।
परमानंद भिजलेसे चिंब ।
विसावती चांदोबा लिंब ।
रिंगण सोहळा ॥
       उभे  रिंगणाचा सोहळा ।
 साठवूनी पाहती डोळा ।
लीला करी अश्‍व भोळा ।
रिंगण करी ॥
   आरती पूजे रिंगण करी ।
वैष्णव रज मस्तकावरी ।
गर्जे मुखी रामकृष्णहरि ।
ज्ञानोबा तुकाराम ॥

संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पाहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे शनिवारी दुपारी भक्तिमय वातावरणात पार पडले. या वेळी लाखो भाविकांनी हे उभे रिंगण पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.

जुन्या ‘हिरा’ या अश्‍वाचे नुकतेच पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन सोहळा सुरू असताना झाले. त्यानंतर शितोळे सरकारांनी लगेच दुसरा अश्‍व उपलब्ध करून दिला. तथापि, ‘हिरा’ या सोहळ्यात सात ते आठ वर्षे चालत होता. चांदोबाचा लिंब येथे पहिल्या रिंगणात नवीन अश्‍व सहभागी झाला होता. या अश्‍वाला पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती. 

यानंतर सोहळा वारीच्या वाटेतील पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंब येथील पुरातन मंदिराकडे मार्गस्थ झाला. सोहळा चांदोबाचा लिंब येथे पोहोचताच चोपदारांनी उभे रिंगण लावून घेत पालखी रथ मध्यभागी उभा करण्यात आला. त्यावेळी रथापुढे रांगोळी काढून संपूर्ण तयारी होत असताना दिंड्यांमधील वारकरी भाविकांनी टाळ-मृदंगाच्या जयघोषात अभंग गायनाला सुरुवात केली.

चोपदारांच्या निर्देशानंतर स्वारांचा अश्‍व व त्यामागे  माऊलींचा अश्‍व व त्या पाठोपाठ  धावत जाऊन माऊलींचे दर्शन घेतले. हा 27 दिंड्या पार करत व प्रसाद घेत अग्रभागी उभा राहिला.  अभूतपूर्व सोहळा भाविकांनी काही काळ अक्षरशः श्‍वास रोखून अनुभवला. त्यानंतर ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात टाळ मृदुगांच्या निनादात माऊलींच्या 
नामाचा जयघोष सुरू झाला. माऊलींचा अश्‍व ज्या मार्गाने धावला तेथील माती भाळी लावण्यासाठी भाविकांची एकच गर्दी केली. त्या दरम्यान झिम्मा फुगडी आणि विविध खेळांत दंग होऊन भाविकांनी जल्लोष केला.

दरम्यान, सोहळा तरडगाव येथील जिल्ह्यातील दुसर्‍या मुक्कामी मार्गस्थ झाला. तरडगावच्या वेशीवर आ. दीपक चव्हाण, वसंतराव गायकवाड, सौ. विमल गायकवाड, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सदस्यांनी माऊलींचे स्वागत केले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने रथातून माऊलींच्या पालखी खांद्यावर घेऊन ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोष करत व टाळ मृदुगांच्या निनादात पालखी  विठ्ठल मंदिर, दिवाण वाडा, श्रीराम बझार, सावतामाळी माळी मंदिर जवळून जात बापू बुवा मठात थांबून या मठात माऊलींची आरती करण्यात आली. 

संपूर्ण पालखी मार्गावर सडा रांगोळी घालून भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा ओढा ओलांडून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारच्या बाजूच्या पालखी  तळावर पोहोचला. तेथे समाज आरतीनंतर माऊली एक दिवसाचा मुक्कामासाठी विसावले. तेथे तरडगाव पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.