Tue, Feb 19, 2019 20:25होमपेज › Satara › दिवसांत २ चोर्‍या, घरफोडीत ५० हजार लंपास 

दिवसांत २ चोर्‍या, घरफोडीत ५० हजार लंपास 

Published On: Jun 30 2018 3:26PM | Last Updated: Jun 30 2018 3:26PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोर्‍यांचे सत्र वाढले आहे. शुक्रवारी  दिवसभरात पुन्हा दोन ठिकाणी चोर्‍या झाल्या. या दोन्ही घटनांमधून रोख पन्‍नास हजार रुपयांच्या रकमेसह ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला. एका ठिकाणी घरफोडी तर दुसर्‍या ठिकाणी हॉटेलच्या पार्कींगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून लॅपटॉपसह साहित्य चोरी झाले आहे.

प्रकाश दिनकर पोतेकर (वय ४५, रा. शेंद्रे ता. सातारा) यांनी रोख ५० हजार रुपयांची रक्कम चोरीप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ते मिलिंद चोरगे यांच्याकडे कामाला आहेत. चोरगे यांचा शाहूपुरीमध्ये आर्चिज अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. हा फ्लॅट बंद असताना दि. २९ रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून घरातील तिजोरीतून रोख ५० हजार रुपये चोरुन नेले. ही घटना समोर आल्यानंतर पोतेकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरीप्रकरणी तक्रार दिली.

पराग शिरीषकुमार सुभेदार (वय ३४, रा. व्यंकटपुरा पेठ) यांनी शहर पोलिस ठाण्यात कारची काच फोडून अज्ञातांनी साहित्य चोरी केली असल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, दि. २९ रोजी रात्री साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत ते गोडोली येथील एका हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी कार पार्किंग केली असताना अज्ञाताने काचेवर दगड मारुन काच फोडून गाडीतील लॅपटॉप, टॅब, दोन मोबाईल व प्रिंटर २६ हजार ६०० रुपयांचे साहित्य चोरी झाले. गाडीजवळ आल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल केला.

दरम्यान, सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. चेन स्नॅचिंग, घरफोड्या, पोलिस असल्याचे सांगून फसवणूक, गाड्यांची काच फोडून चोरी अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.