Fri, Apr 26, 2019 17:32होमपेज › Satara › सातारा : चिंधवलीत विजेच्या शॉकने दाम्पत्य ठार

सातारा : चिंधवलीत विजेच्या शॉकने दाम्पत्य ठार

Published On: Jun 01 2018 9:54PM | Last Updated: Jun 01 2018 9:54PMभुईंज : वार्ताहर

वाई तालुक्यातील चिंधवली येथे शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता कडबा कुट्टीच्या मशिनजवळ काम करत असताना वीज पुरवठा करणार्‍या वायरचा शॉक लागून दाम्पत्य ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुषार रामचंद्र पवार (वय 35) व शितल तुषार पवार (वय 28) अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मे महिना संपल्याने पवार कुटूंबियांनी जनावरांसाठी कडबा जमा करून ठेवला आहे. तुषार पवार हे कलेक्टर ऑफिसला कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते.

तुषार पवार यांचा घराशेजारी गोठा असून या ठिकाणी कडबाकुट्टीची मशिन ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता जनावरांना चारा घालण्यासाठी तुषार व शितल हे कडबा कुट्टीवर कडबा कापण्याचे काम करत होते. त्याचवेळी वीजेचा जोराचा धक्का लागल्यानंतर दोघे पती पत्नी काही फूट अंतरावर जाऊन पडले. नेमका कशाचा आवाज झाला आणि काय झाले हे पाहण्यासाठी पवार यांच्या कुटूंबातील नातेवाईक व शेजारी धावून आले. त्यावेळी त्यांना तुषार व शितल हे दोघेही जमिनीवर पडल्याचे दिसून आले. 

दोघेही बेशुध्द पडल्याने त्यांना जागे करण्याचा प्रयत्न शेजारच्या लोकांनी केला. मात्र, काही केल्या ते न उठल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नारायण पवार व काही लोकांनी या दोघांना गाडीतून सातार्‍यातील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पवार यांच्या घराजवळ पूर्ण गाव लोटला होता. दोघांना सिव्हिलला दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघेही मयत असल्याचे जाहीर केले. 

दरम्यान, वाई शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे चिंधवली गावात पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला होता. मशिनला ज्या वायरने वीज पुरवठा करण्यात येत होता, ही वायर खराब झाल्याने आणि भिजल्याने पवार दाम्पत्याला शॉक बसला, अशी चर्चा परिसरात होती. दरम्यान, पवार दाम्पत्याला मंजिरी नावाची दीड वर्षाची एक मुलगी आहे.