Fri, Aug 23, 2019 21:35होमपेज › Satara › कराड बसस्थानकात सावळा गोंधळ

कराड बसस्थानकात सावळा गोंधळ

Published On: Jun 21 2018 1:20AM | Last Updated: Jun 20 2018 11:34PMकराड : प्रतिभा राजे 

वर्षभरापासून कराड बसस्थानकात अक्षरश: भोंगळ कारभार सुरू आहे. गेल्या तीन वर्षापासून चाललेल्या नूतन इमारतीमुळे प्रवाशांची चाललेली परवड, विद्यार्थ्यांची पासासाठी फरफट होत असून बसस्थानकात ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. याठिकाणी दारूड्यांचा अड्डा झाला आहे. कर्मचार्‍यांकडून उद्धट वर्तणूक होत आहे. आगाराला कोणी सक्षम अधिकारी मिळत नसल्याने याकडे पुरेसे लक्ष कोणी देत नाही. त्यामुळे बसस्थानकाला कोणी वाली राहिला नाही. यामुळे विद्यार्थी व प्रवाशीवर्गातून संताप व्यक्‍त होत आहे. 

गेल्या पाच वर्षामध्ये आगाराला तीन व्यवस्थापक झाले. त्यापैकी जे. के. पाटील व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर रमाकांत गायकवाड यांच्याकडे व्यवस्थापक पदाचा कारभार दिला गेला. गायकवाड यांनी दिड वर्षात चांगले काम केले. गायकवाड यांनी रूजू झाल्यानंतर चांगले उपक्रम राबवले होते. कर्मचार्‍यांनाही शिस्त लावली  होती. शिवाय बसस्थानकातील प्रत्येक बाबींची ते नोंद घेत असत. त्यांची बदली झाल्यानंतर आगारात भोंगळ कारभार सुरू झाला आहे. गायकवाड यांची बदली झाल्यानंतर सुमारे वर्षभर पुन्हा या पदावर कोणी अधिकारी नव्हते. त्यानंतर प्रभारी व्यवस्थापक म्हणून जेे. डी. पाटील यांचेकडे कारभार सोपवण्यात आला. गेल्या दोन महिन्यापासून पुन्हा जे. के. पाटील यांच्याकडेच व्यवस्थापक पदाचा कारभार देण्यात आला. त्यावेळी त्यांनीही चांगले उपक्रम राबवण्याचे आश्‍वासन दिले. मात्र त्यांना प्रमोशन मिळाल्याने पुन्हा कारभार जे. डी.पाटील यांचेकडे आला आहे. 

गेल्या चार वर्षापासून बसस्थानकाचे काम रखडले आहे. दोन वर्षापूर्वी बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आली तेव्हापासून प्रवाशांची अक्षरश: परवड सुरू आहे.  सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची पास काढण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र यासाठी कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. विद्यार्थी पासासाठी महिलेची नेमणूक तर विद्यार्थीनी पासासाठी पुरूष कर्मचार्‍याची नेमणूक केली आहे. महिला कर्मचार्‍यास कोणीही कसेही बोलत आहे. तर काही तरूण याठिकाणी दंगा करत आहेत. बसस्थानकात अनधिकृत फेरीवाले फिरत आहेत. नवीन बसस्थानकात बसेस तात्पुरत्या शिफ्ट केल्या आहेत मात्र या बसस्थानकात रात्रीच्यावेळी दारूड्यांचा अड्डा होत असल्याने याठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या असल्याचे प्रवाशी सांगत आहेत. तर शिस्त नसल्याने नवीन भिंती पिचकार्‍यांनी रंगत आहेत.बसस्थानकात वारंवार चोर्‍यांचे प्रकार घडत आहेत.