होमपेज › Satara › काळजची तमाशा पंढरी ऑर्केस्ट्रा होण्याची भीती

काळजची तमाशा पंढरी ऑर्केस्ट्रा होण्याची भीती

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 8:29PMतरडगाव : सुशिल गायकवाड

फलटण तालुक्यातील काळज येथे लोणंद फलटण मार्गावर गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर् महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेली तमाशे मंडळे दाखल झालेली आहेत. सध्या यात्रांचा हंगाम सुरु झाल्याने काळजच्या तमाशा पंढरीत गावोगावची कारभारी मंडळी, कलाप्रेमी शौकीनांची पावले वळू लागली आहेत. तथापि, पुर्वपंरागत लावण्यांऐवजी प्रेक्षकांची रुची बदलल्यामुळे फिल्मी गाण्यावरील नृत्याची मागणी होत असल्याने तमाशा पंढरी ऑर्केस्ट्रा होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

सध्या विविध टीव्ही चॅनेल्समुळे करमणुकीच्या साधनांची रेलचेल चालली आहे. त्यामुळे तमाशा कलावंतांची अवस्था बिकट झालेली आहे. घरा-घरातच सर्व कार्यक्रम उपलब्ध झालेले आहेत. आजचा प्रेक्षक वर्ग सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्यस्त दिसतो आहे. त्यामुळे अनेकजन तमाशा कलेकडे दुर्लक्षित झालेले आहेत. घरबसल्या अनेक विविध व सहज उपलब्ध झालेली  मनोरंजनाची साधने यामुळे तमाशासारख्या कलेपुढे आव्हान उभे करत आहेत. पूर्वीचा प्रेक्षक गणगवळण, संगीतबारीपासून ते शेवटचा वग बघेपर्यंत थांबत होता.

आजचा प्रेक्षक कधी संगीत बारी संपते आहे. याचीच वाट पाहत असतो. त्यातच ऑर्केस्ट्राचा तमाशा फडात शिरकाव झाल्याने तमाशा मालकांची पंचाईत झाली आहे. तरीही कला जीवंत ठेवण्यासाठी तमाशा तमाशा व लोकनाट्य कलवंतांनी या हंगामात कंबर कसली आहे. कमीत कमी एक शो करण्यासाठी  60 ते 70 हजारांची बिदागी घेतली जात आहे. त्यातून ही लोक 50  हजारांपर्यंत जुळवा-जुळवी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे तमाशात काम करणार्‍या कलावंतांना संभाळायचे तरी कसे हा प्रश्‍न मालकांसमोर उपस्थित राहतो आहे.

तसेच दोन शो करण्यासाठी एक लाख ते सव्वा लाख घेतले जातात. शो जास्त प्रमाणात करायला मिळाल्यास तमाशा कलावंतास सांभाळण्यास फड मालकाला काहीच अडचण येत नाही. तरीही 40 ते 50 जणांचा लवाजमा सांभाळणे खुपच जिकरीचे असते. एखाद्या दिवशी बिदागी मिळो न मिळो, मालकाला कलावंतांची राहण्या-खाण्याची सोय करावीच लागते. दीड महिन्यांच्या यात्रा कालावधीत म्हणजेच गुढी पाडव्या पासून ते अक्षय तृतीया पर्यंतच तमाशा कलावंत यांना बिदागी मिळत असल्याने पोटाची खळगी भरली जातात. परंतु नंतर कसे निभवायचे असा प्रश्‍न कलावंतांसमोर उभा राहतो.  तसेच वेळेची मर्यादा ही रात्री 12 पर्यंत करण्यात यावी,  पोलिस संरक्षण  मिळावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

Tags :  satara ,satara news, trradgaon, Phaltan, cultural programs, changing  traditional program, folk lavni, Bollywood item songs