होमपेज › Satara › ग्रामपंचायतींची 25 टक्के रोपे कोमेजली

ग्रामपंचायतींची 25 टक्के रोपे कोमेजली

Published On: Jul 04 2018 2:20AM | Last Updated: Jul 03 2018 10:49PMशाहूपुरी : अमित वाघमारे

गतवर्षी लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनामध्ये  ग्रामपंचायतींनी 75 टक्के यश मिळवले असले तरी 25 टक्के रोपे मात्र मरून गेल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक ग्रामपंचायतींनी लागवडीचे उद्दिष्ट पार करून  संवर्धनामध्येही आघाडी घेतली आहे. मात्र, काही उदासिन ग्रामपंचायतींमुळे लावलेली रोपे समाधानकारक उगवलेली नाहीत. त्यामुळे यंदाच्या वृक्ष लागवडीत तरी ग्रामपंचायती संवर्धनाचे काम  नेटाने करणार का? याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. 

राज्य शासनाने 13 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम धडाक्यात सुरू केला आहे. यादृष्टीने नुकताच मोठ्या उत्साहात शुभारंभही झाला. सातारा जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे 23 लाख उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, गतवर्षी झालेल्या वृक्ष लागवडीची व संवर्धनाची आकडेवारी पाहिली असता ग्रामपंचायतींनी चांगले यश मिळवल्याचे दिसत आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींनी वृक्षांच्या संगोपनात कोसो मैल मागे राहिल्याचे दिसत आहे. शासनाच्या  विविध विभागांनी संवर्धनाला  अपेक्षित प्रतिसाद दिला नसला तरी ग्रामपंचायतींनी मात्र संवर्धनाच्या कामात शासकीय विभागांच्या तुलनेत आघाडी घेतल्याचे वास्तव आहे. गतवर्षी ग्रामपंचायतींनी 1 लाख  93 हजार 447 रोपे लावली होती. पैकी 1 लाख 45 हजार 246 रोपे जिवंत राहिली आहेत. मात्र, 55 हजार रोपे मृतावस्थेत गेल्याचे वन विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. 

सातारा जिल्ह्यातील रोपांच्या संगोपनात कोरेगाव तालुक्यातील ग्रामपचांयती 98 टक्के, खंडाळा 92 टक्के, जावली (मेढा) 89 टक्के, खटाव (वडूज) 81टक्के, माण (दहिवडी) 78 टक्के, पाटण 73 टक्के हे तालुके आघाडीवर असल्याचे दिसत आहे.  वाई  56 टक्के,फलटण 63 टक्के,सातारा 64 टक्के, महाबळेश्‍वर 69 टक्के, कराड 68 टक्के हे तालुके अन्य तालुक्यांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.  यंदाही जिल्ह्याला एकूण 23 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींना 3 लाख 75 हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी 75 टक्के रोपांचे संवर्धन झाले. त्यामुळे यावर्षी ग्रामपंचायतींना संवर्धनाचीही टक्केवारी वाढवावी लागणार आहे.  

संवर्धनाची टक्केवारी वाढण्याची गरज
पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश आता सर्वदूर पसरला आहे. लोकांमध्येही त्याबाबत मोठी जनजागृती झाली आहे. विविध शासकीय यंत्रणांसह लोकसहभागातून धडाक्यात वृक्ष लागवड सुरू झाली आहे. आता यावर्षी वृक्ष संवर्धनासाठी आणखी गतिमान काम होणे अपेक्षित आहे तरच वृक्ष लागवड व संवर्धन दृष्टीक्षेपात येणार आहे.