होमपेज › Satara › सातारा : पाटणमध्ये राष्ट्रवादीने केले खड्यातच वृक्षारोपण

सातारा : पाटणमध्ये राष्ट्रवादीने केले खड्यातच वृक्षारोपण

Published On: Aug 18 2018 5:15PM | Last Updated: Aug 18 2018 5:07PMपाटण : प्रतिनिधी

पाटण (जि. सातारा) तालुक्यातील रस्त्यांसाठी शेकडो कोटी रुपये मंजुर झाल्याच्या वल्गना पाटणचे लोकप्रतिनिधी करतात, मात्र पाटण तालुक्यात रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. रस्ता कमी आणि खड्डेच जास्त अशी रस्त्याची अवस्था झाल्याने पाटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निसरे फाटा येथे या खड्ड्यात झाडे लावून युती शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

पाटण तालुक्यात रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. लोकप्रतिनिधींनी शेकडो कोटी निधींची घोषणा करूनही पाटण तालुक्यातील रस्त्यांची चाळण का झाली आहे? असा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. जर खरच पैसे मंजुर झाले आहेत तर रस्त्यावर फुट-फुटभर खड्डे का? फक्त वृत्तपत्राचे भांडवल करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्या घोषणा होत्या का? असाच प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. 

या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याची लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या रस्त्यावर अजून किती लोकांचे बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार आहे. केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी सर्वसामान्यांचा बळी घेण्याचे पातक ही राजकीय मंडळी करत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तर, लवकरात-लवकर जर हे खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.  

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेडगे, अविनाश पाटील, पाटण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरुदेव शेडगे,सरचिटणीस अमोल माने,तानाजी भिसे, राघवेंद्र पाटील, राज पाटील, आबासो चव्हाण, अमोल पवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.