Mon, Jun 24, 2019 16:59होमपेज › Satara › आग रामेश्‍वरी अन् बंब सोमेश्‍वरी!

आग रामेश्‍वरी अन् बंब सोमेश्‍वरी!

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:15PMओझर्डे : वार्ताहर 

महामार्गावर जर एखाद्या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणार्‍या वाहनाचा अपघात झाला किंवा जर राज्यमार्गाच्या कडेला असलेल्या एखाद्या झाडाला आग लागली तर ती आग आटोक्यात आणण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे अग्निशामक व्यवस्था उपलब्ध नसल्याने मोठा अनर्थ ओढवू शकतो याचा अनुभव सुरूर, ता. वाई येथे वाई- सुरूर रस्त्यावरील वटवृक्षाला लावलेल्या आगीमुळे आला. 

त्याचे झाले असे की, वाई सुरूर रस्त्यावरील गॅस पंपाच्या जवळ असलेल्या वटवृक्षाला आग लागल्याचे सुरूर ता. वाई येथील ग्रामस्थांच्या सायंकाळी सहाच्या दरम्यान लक्षात आले. सुरूर येथील ग्रामस्थ व युवक तातडीने या ठिकाणी जमा झाले व त्यांनी भुईंज पोलीस स्टेशन,वाई नगरपालिकेच्या अग्निशामक बंब यांना घटनास्थळी पाचारण करण्यासाठी फोनवरून संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून भुईंज पोलिस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. परंतु अडीच तास वाट पाहूनसुध्दा वाई नगरपालिकेचा बंब दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी किसन वीर सहकारी साखर कारखाना लि. भुईंज येथील अग्निशामक बंबासाठी मोबाईलवरून संपर्क साधला.

अर्ध्या तासात कारखान्याचा बंब घटनास्थळी दाखल झाला. यादरम्यान तीन तासाचा वेळ वाया गेल्याने वार्‍याच्या प्रचंड झोतामुळे आग भडकत गेली. अग्नीच्या भक्ष्यस्थानी असलेला वटवृक्ष रस्त्यावर कोसळण्याच्या शक्यतेने पोलिसांनी वाई सुरूर रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी काही काळ रोखून ठेवली. संपूर्ण आग आटोक्यात आल्यावर वाई नगरपालिकेचा बंब पोहोचला व दोन्ही बंबाच्या सहाय्याने आग पूर्ण आटोक्यात आली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

झाडाच्या वाळलेल्या भागामध्ये रसायनयुक्त कापडाचे बोळे ठेवून त्याने आग लावल्याचा आरोप ग्रामस्थ करीत असून आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने संपर्क साधल्यानंतरसुद्धा तीन तासानंतर वाई नगरपालिकेचा बंब आल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.