Fri, Jun 05, 2020 23:25होमपेज › Satara › झाडांच्या कत्तली; प्रवाशांचा जीव टांगणीला

झाडांच्या कत्तली; प्रवाशांचा जीव टांगणीला

Published On: Oct 06 2018 1:45AM | Last Updated: Oct 05 2018 9:11PMपाटण :  गणेशचंद्र पिसाळ  

कराड ˆ चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी होत असलेल्या शेकडो वर्षे जतन केलेल्या हजारो महाकाय वृक्षांची येथे राजरोसपणे कत्तल सुरू आहे. एक झाड तोडल्यावर पाच झाडे लावण्याचे बंधन अद्यापतरी कोठेच दिसत नाही. याशिवाय कागदोपत्री दाखविलेली व प्रत्यक्षात तोडलेली झाडे यात कमालीची तफावत आहे. यात शासनाचे वाटोळे तर संबंधित ठेकेदार व कागदोपत्री झोलझाल करणार्‍या अधिकार्‍यांची दिवाळी चालू आहे. 

मात्र नियोजनशून्य या तोड व तडजोडीत सामान्य प्रवासी व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न वार्‍यावर सोडण्यात आल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. 

रस्ता रुंदीकरणच्या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार्‍या झाडांवर येथे पहिला घाव घातला गेला आहे. प्रगती करताना दुसरीकडे अशा गोष्टी स्वाभाविकच असल्या तरी त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना व खबरदार्‍या घेणेही तितकेच महत्त्वाचे असले तरी संबंधित कंपनीकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. वास्तविक याबाबतच्या सर्वच शासकीय कागदोपत्री बाबी या मुळातच संशय व संशोधनाचा विषय आहेत. कारण येथे वनखात्याच्या परवानग्या, प्रत्यक्ष असणारी झाडे, त्यांचे दर आणि कागदोपत्री त्याची कमीत कमी दाखविलेली नोंद यात संबंधित अधिकारी व लाकूड व्यापारी ठेकेदार यांचे चांगलेच उखळ पांढरे झाले आहे. शेकडो वर्षे जतन केलेल्या हजारो महाकाय वृक्षांची येथे राजरोसपणे कत्तल सुरूचआहे. 

दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून हे कामकाज सुरू असते त्यामुळे पूर्वनियोजित कामांचा खोळंबा तर होतोच. शिवाय तोडलेली झाडे त्यांच्या फांद्या, कचरा रस्त्यावर कसाही टाकला जात असल्याने मुळातच अपुर्‍या रस्त्यावर हमखास दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनांचाही अपघात होत असतो मात्र संबंधितांना याचे कोणतेही सोयरसुतक नसते. येथे मुळात असणारी झाडे, कागदोपत्री दाखविण्यात आलेली झाडे त्यांचे अंदाज पत्रक व प्रत्यक्षात झालेली तोड व तडजोड याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी व्हावी. याशिवाय येथील सुरक्षा व्यवस्था प्रवाशांच्या जीवाशी होणारा खेळ व नियमानुसार त्या बदल्यात करावयाची वृक्षलागवड याबाबतही चौकशी होवून संबंधितांवर आवश्यक त्या कारवाया कराव्यात अशाही मागण्या होत आहेत.                                

कामगारांची सुरक्षाही रामभरोसे

एका बाजूला या मंडळींनी शासनाला अशाप्रकारे चुना लावला असताना दुसरीकडे या रस्त्यावरून जाणार्‍या प्रवासी व वाहनधारकांच्या सुरक्षेची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही व मनमानीनुसार हा वृक्ष कत्तलीचा कार्यक्रम सुरू असतो. याबाबत कोणालाच आणि कसलीच पूर्वसूचना दिली जात नाही. मनात आले की कत्तल सुरू. प्रशिक्षित, आधुनिक यंत्रणा नाही किंवा प्रवासी तर लांबच ही वृक्षतोड करणार्‍या कामगारांचीही सुरक्षा रामभरोसे असते.