Sat, Jun 06, 2020 07:18होमपेज › Satara › वृक्षतोडीमुळे सातारा-पंढरपूर मार्ग भकास 

वृक्षतोडीमुळे सातारा-पंढरपूर मार्ग भकास 

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 9:16PMसातारा : प्रतिनिधी

सातार-पंढरपूर राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रस्त्यांच्या दोहोबाजूला वडाच्या महाकाय झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याने पर्यावरणप्रेमीसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदाराने झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात केली असली तरी त्याने पावसाळ्यात वृक्षांची लागवड करावी. अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

सातारा-पंढरपूर राज्यमार्गाचे गेल्या काही महिन्यापासून चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड, पिंपळ यासह विविध प्रजातीची महाकाय झाडे आहेत. मात्र, संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराने या महाकाय झाडांची कत्तल राजरोसपणे सुरू केली आहे. मोठमोठी झाडे यंत्राच्या सहाय्याने काही क्षणातच जमीनदोस्त केली  जात आहेत. या प्रकारामुळे पर्यावरण व वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याने अनेक पदाधिकारी जात असले तरी त्यांना राजरोसपणे सुरू असलेली झाडांची कत्तल का दिसत नाही? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

झाडांची मोठ्या प्रमाणात  कत्तल केल्यामुळे सर्वत्र भकास वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर उजाड माळरानासारखा झाला आहे. शासन एकीकडे हजारो  कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेते आणि दुसरीकडे महाकाय वृक्षांची कत्तल करावयाची. याबाबत कुणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्‍न परिसरातील नागरिकांना पडला आहे.महाकाय झाडांच्या वृक्षतोडीसंदर्भात संबंधित ठेकेदाराने वनविभागाची परवानगी घेतली आहे का? असा सवालही पर्यावरण प्रेमीमधून उपस्थित केला जात आहे.संबंधित ठेकेदाराने सरसकट झाडांची कत्तल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, त्याने रस्त्यात येणारी झाडे व त्यांच्या फांद्या तोडाव्यात अन्य झाडे तोडू नयेत. ज्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत त्या झाडांच्या दुप्पट झाडे  या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात यावीत. पावसाळ्यात या ठिकाणी झाडे न लावल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय परिसरातील ग्रामस्थांनी घेतला आहे.

Tags : Satara,  tree, cutting, Satara, Pandharpur, road