Tue, Apr 23, 2019 22:16होमपेज › Satara › कराडः रस्त्याकडेच्या झाडांची खुलेआम कत्तल 

कराडः रस्त्याकडेच्या झाडांची खुलेआम कत्तल(व्हिडिओ) 

Published On: Dec 04 2017 12:00PM | Last Updated: Dec 04 2017 12:00PM

बुकमार्क करा

कराडः अमोल चव्हाण

शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असतानाच रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कराड ते कोयनानगर दरम्यान खुलेआम वृक्षांची कत्तल केली जात आहे. मोठमोठ्या वृक्षांवर यांत्रिक कटर चालवला जात असल्याने झाडे जमीनदोस्त होत आहेत. यामुळे रस्त्याकडेची वृक्षसंपदा नष्ट होत असून, झकास रस्ता भकास होऊ लागला आहे. याबाबत वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्याची चिंता वाढवणारी ठरत आहे.

राज सरकारबरोबरच मोदी सरकार पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. शासकीय पातळीवर वृक्षलागवडीच्या मोहिमेला मोठे यशही आले. परंतु, सध्या या योजनेला विकासाच्या व रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तिलांजली देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा विकास पर्यावरणाला भकास तर करत नाही ना असा प्रश्न निर्माण होतो.

कराड ते कोयनानगर पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सरकारने हाती घेतले आहे. हा रस्ता चौपदरीकरण करण्यात येणार असून तो सिमेंटचा बनविला जाणार आहे. त्यासाठी सध्या युध्द पातळीवर काम सुरू आहे. हा रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांची तोड केली जात आहे. झाडे तोडल्याशिवाय रुंदीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे ठेकेदाराने साकुर्डी फाटा ते कोयनानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या वृक्षांची कत्तल करण्यास सुरुवात केली आहे. 

या वृक्षतोडीमुळे हा रस्ता भकास होऊ लागला असून रस्त्यावरील झाडांची प्रवाशांना मिळणारी सावली नष्ट होत आहे. लहानमोठ्या सर्व झाडांवर यांत्रिक कटर चालविला जात आहे. त्यामुळे काही क्षणात झाडे जमीनदोस्त होत आहेत. तोडलेली झाडे कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून कुठे नेली जातात याबाबत कामगारांनाही काही सांगता येत नाही. त्यामुळे तोडलेल्या झाडांचे पुढे काय होते हे समजू शकले नाही. 

रस्त्याकडेच्या झाडांच्या सुरू असलेल्या तोडीबाबत पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. जेवढी झाडे तोडली जातील त्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी झाडांचे रोपण करावे अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. अन्यथा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 

झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण करावे... 
एखादे रोप लावल्यानंतर त्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर व्हायचे असेल तर त्याला अनेक वर्षे जावी लागतात. कराडपासून कोयनानगरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक लहान-मोठी वृक्ष आहेत. ही झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. तसे केले तर झाडेही सुरक्षित राहतील आणि पर्यावरणाची हानी होणार नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला झाडांची तोड करण्यापेक्षा त्यांचे पुनर्रोपण करण्यास सांगावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.