होमपेज › Satara › वाहतूक कोंडीचं पहिलं ठिकाण ‘नाक्याचं’

वाहतूक कोंडीचं पहिलं ठिकाण ‘नाक्याचं’

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 13 2018 11:03PMसातारा : प्रतिनिधी 

सातार्‍यातील वर्दळीच्या असलेल्या पोवई नाक्यावर अलिकडे वारंवार वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. कधी सिग्‍नल यंत्रणेतील त्रुटीमुळे तर कधी बेफिकीर वाहन चालकांमुळे कोंडी नित्याचीच ठरली आहे. असे असताना आता हे कमी की काय म्हणून रस्त्यावरील दगड उखडल्यामुळेही वाहतुकीचे तीनतेरा  वाजू लागले आहेत. त्यामुळे पोवई नाक्यावरील वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली असून लवकरात लवकर धोकादायक दगड हटवून तेथे बॅरिकेटस् उभारण्याची मागणी नागरिक करु लागले आहेत. 

सातारा शहरातील मुख्य चौक असलेल्या पोवई नाक्यावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरुन गोडोलीमार्गे कराड-कोल्हापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक तसेच बाँम्बे रेस्टारंटकडे जाणारी व तेथून येणारी वाहतूक याच मार्गावरुन होते. या  चौकातून शहरातील वाहतूकदारांबरोबर बाहेरच्या जिल्ह्यात जाणारी देखील वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यात पोवई नाक्यावर दगड उखडून रस्त्यावर आले आहेत. तसेच उखडलेले दगड चुकवताना वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.  चारही बाजूनी एकदम वाहने येत असल्यामुळे रस्ता पार करण्यात नागरिकांना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाहनधारक आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग झालेले आहेत. पोवई  नाक्यावरुन काही अंतरावर महाविद्यालय असल्यामुळे येथून विद्यार्थ्यांची नेहमीच ये—जा असते. या चौकातून गडबडीत जाण्याच्या नादात अनेक वेळा विद्यार्थ्यांचे अपघात घडले आहेत. प्रशासनाने येथील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी तसेच अपघात टाळण्याच्या दृष्टीने योग्य त्या अंमलबजावणी करण्याची गरज आहे. उखडलेल्या रस्त्यावर बॅरिकेटस् लावले तर वाहतूकही सुरळीत होईल.त्यामुळे पोवई नाक्यावरील उखडलेले दगड हटवण्याची मागणी नागरिकातून होऊ लागली आहे.