Wed, Jun 26, 2019 11:48होमपेज › Satara › कराड : ठिय्या आंदोलन स्थगित; शांतता राखण्याचे आवाहन

कराड : ठिय्या आंदोलन स्थगित; शांतता राखण्याचे आवाहन

Published On: Aug 08 2018 11:48AM | Last Updated: Aug 08 2018 11:48AMकराड : प्रतिनिधी

कराड (जि. सातारा) येथील दत्त चौकात १ ऑगस्टपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन गुरूवार, ९ ऑगस्टला स्थगित करण्याचा निर्णय मराठा समाज बांधवांनी घेतला आहे. त्याचबरोबर कोणीही कराडमध्ये येऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करत सकल मराठा समाज बांधवांचा आरक्षणासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी लोकशाही मार्गाने लढा चालू आहे आणि यापुढेही राहणार असल्याची ग्वाही कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर सोशल मिडियाच्या माध्यमातून कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यापूर्वी २५ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद यशस्वी करुन कराडमधील सर्व व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक यांनी पाठिंबा दिला होता. राज्यातील काही ठिकाणी मराठा आंदोलनावेळी समाजकंटकांनी हस्तक्षेप करत लोकशाही मार्गाने आणि संपूर्ण जगाने कौतुक केलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे असा प्रकार पुन्हा गुरूवार, ९ ऑगस्टला समाजकंटकांकडून होऊ शकतो. कराडमधील तहसील कार्यालयासमोरील आणि दत्त चौकातील ठिय्या आंदोलनास उपस्थित रहात हिंदू एकता आंदोलन समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा जिल्हा बहुजन क्रांती दलाच्या कराडमधील समन्वयकांनी, व्यापारी, खते व बियाणे विक्रेते यांच्यासह सर्वच समाजघटकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी विशेषतः युवकांनी कराडमध्ये एकत्र येऊ नये. रॅली काढून तणावाची स्थिती निर्माण करू नये. 

यापूर्वीप्रमाणेच कराडमधील सर्व व्यापारी, व्यावसायिक यांना स्वंयस्फूर्तीने सहकार्य करत शांतता, संयमाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन सकल मराठा समाज बांधवांनी  केले आहे. गुरूवारी कोणीही अशांतता अथवा कायदा हातात घेत अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांची माहिती पोलिसांना देत सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर व्हॉटस् ऍप,  फेसबुकच्या माध्यमातून अफवा, गैरसमज पसरवण्याचेही प्रयत्न सुरू असून त्यावर कोणीही विश्‍वास ठेऊ नये अथवा अशा पोस्ट,  फोटो, माहिती कोणीही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.