Tue, Apr 23, 2019 19:43होमपेज › Satara › चोरीचे ते पिस्तूल फौजदाराचे

चोरीचे ते पिस्तूल फौजदाराचे

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 11:24PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पिस्तूलप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याजवळ दोघा युवकांना ताब्यात घेतले होते. सैन्य भरतीला गेल्यानंतर संशयित युवकांनी हा ‘पराक्रम’ केला असून त्यांनी भुईंज परिसरात हवेत गोळीबार केला असल्याचेही समोर आले आहे. रत्नागिरी येथील फौजदाराचे हे पिस्टल असून  दोन वर्षापूर्वी ते चोरल्याचे तपासात पुढे आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी दि. 9 रोजी सातारा एलसीबीने पिस्तूल चोरीप्रकरणी श्रीधर ज्ञानदेव कुंभार (रा. गडकरआळी) व स्वयंभू मेघराज शिंदे (रा.वाई) यांना पिस्तूल व एका राऊंडसह ताब्यात घेतले होते. जप्‍त केलेले  पिस्तूल आय.ओ एफ (भारतीय आयुध निर्माणी) बनावटीचे असल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. हे पिस्तूल भारतीय सैन्यदल व देशातील पोलीस दलांमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हर  म्हणून वापरतात. सातार्‍यात पोलिसांनी हे पिस्तूल जप्‍त केल्यानंतर त्याच्या मुळाशी जावून तपास केल्यानंतर याबाबतचा  उलगडा झाला.

2015 मध्ये रत्नागिरी येथे सैन्य भरतीच्या  बंदोबस्तासाठी  फौजदार भीमराव पाटील (सध्या नियुक्ती कोल्हापूर) हे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व्हिस पिस्तूल पिशवीत ठेवून ती पिशवी दुचाकीला अडकवली होती. चोरट्यांनी हीच संधी साधून ते पिस्तूल 10 राऊंडसह चोरले. पिस्तूल चोरीला गेल्यानंतर रत्नागिरी पोलिस दलात खळबळ उडाली होती. सर्वत्र शोध घेवून पिस्तूल व राऊंड सापडत नसल्याने त्याबाबत फौजदार पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पिस्तूल चोरीची तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून रत्नागिरी पोलीस पिस्तूल चोरणार्‍याचा तपास करत होते. मात्र त्यांना यश आले नाही.

दरम्यान, सातारा पोलिसांनी पिस्तूल चोरी प्रकरणी वाई व सातारा येथील युवकांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांनीच दोन वर्षापूर्वी पिस्तूल चोरल्याची कबुली दिली. चोरी करताना संशयितांनी अनेक काडतुसेही चोरली होती. गावाकडे आल्यानंतर ती युवकांनी हवेत उडवली. सध्या दोन्ही संशयितांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सातारा पोलिसांनी याबाबत रत्नागिरी पोलिसांना कळवले आहे.

सातारा एलसीबीने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे.