Thu, Jul 18, 2019 15:05होमपेज › Satara › तारळे बाजारात चोरट्यांचा उच्छाद सुरुच

तारळे बाजारात चोरट्यांचा उच्छाद सुरुच

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:14AMतारळे : वार्ताहर

गर्दीचा फायदा घेत आठवडा बाजारातून मोबाईल, पर्स तसेच अन्य महागड्या वस्तू चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता तारळेसह परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी हैराण झाले आहेत. त्यामुळेच पोलिसांनी उपाययोजना करत चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

शनिवारी तारळे येथे आठवडी बाजार असतो. या बाजारात तारळेसह परिसरातील हजारो लोक खरेदीसाठी गर्दी करतात. त्याचबरोबर शेतीसह अन्य उत्पादनांची विक्री करण्यासाठी स्थानिक शेतकरी, व्यापार्‍यांबरोबर सातारा, कराड येथील व्यापारी बाजारला येतात. याशिवाय सडावाघापूर, जळव, कडवे, कळंबे, घोट परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावरून बाजारात खरेदीसाठी येतात.

तांदळासह सर्व प्रकारची धान्ये व कडधान्याला चांगली मागणी  असल्याने अनेक शेतकरी आपला माल बाजारातच विकण्यास पसंती देतात. तर आवठड्यासाठी लागणारा भाजीपाला खरेदी करण्याकडे ग्रामस्थांचा कल असतो. त्यामुळे शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरु होणारा बाजार दुपारनंतर पूर्णपणे भरतो. त्यामुळे होत असलेल्या गर्दीचा फायदा घेत सराईत चोरटे आपला खिसा गरम करतात. तर सर्वसामान्यांना मात्र मोठी आर्थिक झळ सोसावी लागते.

आजवरच्या घटना पाहता बाजारातील चोर्‍यांमागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. अचानकपणे मोबाईल, पैसे चोरीस गेल्याने अनेकदा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बाजारादिवशी वारंवार बाजारात चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे यांची पूर्ण माहिती असूनही ग्रामस्थ निष्काळजीपणा दाखवत आहेत. त्यामुळेच चोरट्याचे फावते आहे. गेल्य आठवड्यात एसटीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेले. संबंधित महिलेच्या लक्षात ही गोष्ट आली होती, मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. 

अशा घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना केव्हा यश येणार? असा प्रश्‍न तारळे ग्रामस्थांसह व्यापारी, विक्रेते उपस्थित करत आहेत.