Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Satara › कवसकुली टाकून सव्वा लाख लंपास

कवसकुली टाकून सव्वा लाख लंपास

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:26PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील गजबजलेल्या पोवई नाका येथून अज्ञात चोरट्याने एकाच्या अंगावर कवसकुली टाकून सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांची रक्कम चोरून पोबारा केला. शुक्रवारी भरदिवसा दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, पोवई नाका येथे एका वृद्धाने बँकेतून काही रक्कम काढली. पोवई नाक्यावरून पायी जात असताना ते रस्त्याकडेला थांबले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर कवसकुली टाकल्याने वृद्धाचे अंग खाजवू लागले. अंग खाजवत असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने गजबजलेल्या ठिकाणी वृद्धाला धक्का मारून त्यांच्याकडील सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांच्या रकमेची बॅग जबरदस्तीने चोरून नेली.

चोरट्याने रक्कम चोरल्यानंतर वृद्धाने जोरजोरात आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत अज्ञात चोरट्याने तेथून पळ काढला होता. या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरू होती. मात्र, चोरटा व रक्कम पोलिसांच्या हाती लागली नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

दरम्यान, सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कवसकुली टाकून चोर्‍या करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.