होमपेज › Satara › रेठर्‍यातील लग्‍नात चोरट्याचे धनमंगल

रेठर्‍यातील लग्‍नात चोरट्याचे धनमंगल

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:46PMरेठरे बु : प्रतिनिधी 

रेठरे बु. खारेफटा (ता. कराड) येथील लग्‍न कार्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे लाकडी तिजोरीत ठेवलेले सुमारे 11 तोळे सोने चोरट्यांनी हातोहात लंपास केले आहे. लग्‍नघरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बंगल्यात चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. 

रेठरे बु. खारेफटा येथे एका कुटुंबात गुरुवारी (दि. 19) चिखली (शिराळा) येथे लग्‍नकार्य होते. त्यासाठी सरूड (ता. शिराळा, सध्या राहणार पुणे) येथून आपल्या चुलत भावाच्या लग्‍नासाठी सौ. पल्लवी गणेश पाटणकर आल्या होत्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या बंगल्यातील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या रूममधील लाकडी तिजोरीत 8 तोळ्यांच्या 8 बांगड्या, 2 तोळ्यांचा राणीहार, कानातील     व इतर लहान दागिने होते. 

लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि.17 रोजी सौ. पल्लवी या नवर देवाच्या घरी रात्री 8 वा. जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्या संधीचा फायदा घेवून लहान कपाटात ठेवलेल्या चावीने तिजोरी उघडून आतील पर्स मधील राणीहार, बांगड्या असे 11 तोळे सोने चोरट्यांनी गायब केले. सौ. पल्लवी या जेवण करून आल्यानंतर त्यांना तिजोरीचे दार उघडे असल्याचे दिसले होते,परंतु काही तरी घेण्यासाठी दार उघडले असेल असे समजून त्यांनी ते दार स्वतःच बंदही केले होते.

शिवाय त्यात असलेले 4 हजार रूपये व अन्य सोन्याच्या दागिण्यांना  चोरट्यांनी हातही लावलेला नाही.तर शेजारी रूममध्ये चुलत बहिणीची मुलगी झोपली होती. पण तिलाही काही समजले नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी 8 च्या सुमारास लग्नाला जाण्याच्या तयारीने सौ.पल्लवी यांनी तिजोरी उघडली असता पर्स व सोने तेथे नसल्याचे त्यांना दिसून आले. हा प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी वडीलांच्या कानावर हा प्रकार घातला पण घरी शुभ कार्य असल्याने वाच्यता न करता ते लग्नाला गेले. परत आल्यानंतर सायंकाळी सदर घटनेचा प्रकार त्यांनी सर्वाना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून काही संशयीतांची कसून चौकशी केली मात्र काही आढळून आले नाही. वास्तविक गजबजलेल्या ठिकाणी बंगला असूनही त्याठिकाणी चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.