Fri, Jul 19, 2019 17:47होमपेज › Satara › इंजिनिअरचा बंगला फोडला

इंजिनिअरचा बंगला फोडला

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:45PMकराड : प्रतिनिधी

कराड लगत असलेल्या गजानन सोसायटीमध्ये चोरट्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरचा बंगला फोडला. बंगल्यातील देवघर व कपाटातील साहित्य विस्कटून चोरट्यांनी रोख रक्‍कम, एलईडी टीव्ही व कार असा सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केली. बुधवारी (दि. 18) रात्री ही घटना घडली असून, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन सोसायटी- सैदापूर (ता. कराड) येथे सचिन प्रल्हाद जाधव हे कुटुंबीयांसह राहतात. ते चिपळूण, रत्नागिरी भागात वीज कंपनीची कामे करत असतात. तर त्यांचे वडील प्रल्हाद जाधव हेही ओगलेवाडी येथील वीज कंपनीच्या कार्यालयात इलेक्ट्रिक इंजिनिअर होते. ते सध्या निवृत्त झाले असून पुणे येथे राहतात. त्यामुळे गजानन सोसायटी येथील बंगल्यात सचिन जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुले राहतात.

दरम्यान, नातेवाईकाच्या ऑपरेशनसाठी सचिन जाधव यांच्या पत्नी बुधवारी पुणे येथे गेल्या होत्या. तर त्यांची दोन्ही मुले रात्री झोपण्यासाठी मामांकडे विद्यानगरमध्ये गेली होती. त्यामुळे बुधवारी रात्री सचिन जाधव यांचा बंगला बंद होता. बंगला बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व कपाटांमधील व देवघरातील साहित्य चोरट्यांनी विस्कटून टाकले होते. यामध्ये सुमारे तीन हजारांची रोख रक्कम व एलईडी टीव्ही चोरट्यांनी चोरून नेला आहे. 

दरम्यान, चोरट्यांनी जाताना भिंतीवर अडकवलेली चावी घेऊन बंगल्याच्या पाठीमागील कारसह तेथून पलायन केले. गुरुवारी सकाळी त्यांचा मुलगा क्लास वरून घरी आला असता घरात चोरी झाल्याचे त्याला समजले. चोरीची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठसेतज्ञ व श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले असून टोलनाका व इतर मार्गांवर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलीस पाहणी करत आहेत. घरफोडीची फिर्याद महेश पवार यांनी शहर पोलिसात दिली असून अधिक तपास सपोनि स्वप्निल लोखंडे करत आहेत. 

सीसीटीव्ही नसल्याने अडचण... 

गजानन सोसायटी व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सोसायटीमध्ये प्रमुख मार्गांवर किंवा प्रमुख ठिकाणी कोठेही सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचण निर्माण होत आहे. यापूर्वी अशा घटना घडल्या असतानाही गजानन सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसविला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान सचिन जाधव यांचे वडील प्रल्हाद जाधव हे गजानन सोसायटीचे संचालक असून आता तरी सोसायटीमध्ये प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा लोकांमधून व्यक्त केली जात आहे.