Thu, Jun 27, 2019 13:48होमपेज › Satara › विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षक दारोदारी

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षक दारोदारी

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:48AMसातारा : प्रतिनिधी

विद्यार्थी प्रवेशासाठी शाळांकडे धाव घेण्याऐवजी शिक्षकच विद्यार्थ्यांच्या दारी जावून विद्यार्थी व पालकांना प्रवेशासाठी गळ घालतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पालकांचेही चांगलेच भाव वधारले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळासह, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना नोकरी टिकविण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतही चांगलीच धावपळ करावी लागत आहे.

विद्यार्थ्यांची घटलेली संख्या व त्याप्रमाणात शाळांची वाढलेली संख्या  असा असमतोल आणि पालकांचा इंग्रजी शाळाकडील वाढता कल यामुळे मराठी शाळांवर संकट कोसळले आहे. खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षकांना  संरक्षण मिळविण्यासाठी शाळेची पटसंख्या किमान कायम ठेवणे आवश्यक आहे. मात्र, मागील काही वर्षापासून मराठी शाळांतील  विद्यार्थी पटसंख्या सतत रोडावत चालली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक ठरत आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना शिक्षण विभागालाही नाकीनऊ येत आहे.येत्या 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होणार असल्याने  शाळेतील पटसंख्या टिकविण्यासाठी सर्व शाळांचे संस्थाचालक व शिक्षकांची विद्यार्थी मिळवण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. पटसंख्येवर शिक्षक निश्‍चिती होत असल्याने अनेक शिक्षकांनी  विद्यार्थी मिळवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण भागात अनेक शाळा व विद्यालयातील शिक्षक रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांच्या शोधात फिरताना दिसत आहेत.जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळा व विद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागल्याने विद्यार्थी सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, शिक्षकांना जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेत कसे प्रवेश घेतील याची चिंता लागली आहे. दर्जेदार शाळांमध्ये  मुलाला प्रवेश मिळावा. यासाठी पालकांची धडपड सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. दुसरीकडे मात्र काही शाळांना विद्यार्थी शोधावे लागत आहेत. शाळेतील तुकड्या व पटसंख्या  टिकविण्यासाठी विद्यार्थी शोधण्याचे  फर्मान संस्थाचालकांनी सोडल्यामुळे भर उन्हात शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात गावोगावी भटकत आहेत. 15 जून नंतर सर्व शाळा विद्यालये सुरू होणार आहेत. मात्र , त्याअगोदरच  विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नावनोंदणीसाठी शिक्षक कामाला लागले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी शहरी  भागातील वेगवेगळ्या  विभागात,  झोपडपट्ट्यात  तसेच ग्रामीण भागातील  वाड्या वस्त्यांवर जावून शिक्षक पालकांची मनधरणी करताना दिसत आहेत.
 

Tags : satara, theater,  student