Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Satara › खटाव सभापती, उपसभापतीविरोधात अविश्‍वास

खटाव सभापती, उपसभापतीविरोधात अविश्‍वास

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:55PMखटाव : प्रतिनिधी   

खटाव पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सभापती संदीप मांडवे आणि उपसभापती कैलास घाडगे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्याच सहा  नाराज सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे  अविश्वास ठराव दाखल केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी स्वपक्षीय पदाधिकार्‍यांवर अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे तालुक्यासह  जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पदाधिकारी राजीनामा देणार की राष्ट्रवादीविरोधातच बंड करणार याकडे तालुक्याच्या  नजरा लागल्या आहेत.

खटाव पंचायत समितीच्या  बारा पैकी राष्ट्रवादीचे  आठ तर काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. खटाव तालुका कोरेगाव, माण आणि कराड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. सभापतींचा गण माण तर उपसभापतींचा गण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येतो. मांडवे आणि घाडगे यांच्या निवडीवेळी  विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक - निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी सदस्यांना प्रत्येकी सव्वावर्षे संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सव्वा वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही मांडवे आणि घाडगे यांनी राजीनामा दिला नाही.  याबाबतची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनीही चर्चा केली. मात्र, त्यांचाही आदेश झुगारुन लावण्यात आल्यामुळे खटावसह जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर राष्ट्रवादीचे  सदस्य  हिराचंद पवार, कल्पना मोरे, जयश्री कदम, रेखा घार्गे, संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे यांच्या सह्या आहेत. दरम्यान, अविश्वास ठरावाची नोटीस जिल्हाधिकार्‍यांकडे  दाखल केल्यानंतर सर्वच पंचायत समिती सदस्यांनी सभापती मांडवे आणि उपसभापती घाडगे यांच्या कार्यपध्दतीवर आणि मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली.

राजीनामे देण्यात  सभापती, उपसभापतींची चालढकल

2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादीचे आठ तर उर्वरित चार सदस्य विरोधकांचे निवडून आले होते. प्रत्येक इच्छुकाला संधी मिळण्यासाठी सव्वा वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. तशी कल्पनाही रामराजे, आ. शिंदे, आ. पाटील, माजी आ. घार्गे यांनी संबंधितांना दिली. मात्र, सभापती मांडवे आणि उपसभापती कैलास घाडगे यांनी राजीनामे देण्यास टाळाटाळ करणे सुरु केले आहे. परिणामी अन्य सहा सदस्य नाराज झाले असून त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.

सहा सदस्यांची नाराजी राष्ट्रवादीला  भोवणार

सभापती संदीप मांडवे आणि उपसभापती कैलास घाडगे हे राष्ट्रवादीचे असलेतरी त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच वरिष्ठ नेत्यांचाच आदेश डावलल्यामुळे खटाव तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मांडवे आणि घाडगे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे अन्य सहा  सदस्य संतप्त झाले आहेत. या सदस्यांची नाराजी आगामी काळात पक्षालाच अडचणीची ठरणार आहे.