Wed, Nov 21, 2018 19:28होमपेज › Satara › ...तर शेतकरी आत्महत्या थांबतील

...तर शेतकरी आत्महत्या थांबतील

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:28PM

बुकमार्क करा
तारळे : वार्ताहर

युवकांच्या हाताला काम नाही.शेतकर्‍यांच्या मालाला किंमत नाही. शेती उत्पादनांना बाजारपेठ नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करत आम्ही शासनाला विकास आराखडा सादर केला आहे. शासनाने त्याचा गांभिर्याने विचार करत अंमलबजावणी केल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा दावा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी केला आहे.

जाती, धर्म, शेतकर्‍यांच्या व्यथा आणि श्रमिकांचे शोषण यावर आसूड ओढत श्रमिक मुक्ती दलाचे 21 व्या आधिवेशन सावरघर (ता. पाटण) येथे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. यावेळी उपाध्यक्ष वाहारु सोनावने, संपत देसाई, गेल मव्हेट, प्रशांत पन्हाळकर, सुभेदार मेजर बन, आनंदराव सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती .

भारत पाटणकर म्हणाले, आज देशात विकासाचे मुद्दे बाजूला पडले आहेत. जाती धर्माच्या नावाखाली लोकांचे खून होत आहेत. यातून विचारवंत, पत्रकारही सुटलेले नाहीत. त्यांना दिवसा गोळ्या घातल्या जात आहेत. वाडीवस्ती, गरीब - श्रीमंत  यात रुजलेली जात प्रथम गाडली पाहिजे. 

तीन हजार वर्षापासून लोकांना जातीच्या गुलामगिरीत जखडून ठेवले आहे. प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के जमिनी मिळतील. तसचे या जमिनींना पाणी मिळणार असून स्वाभिमान न विकता पुढे जा, असे आवाहनही पाटणकर यांनी यावेळी केले.  यावेळी वाहारु सोनावने यांचेही भाषण झाले. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांची तारळेतून सावरघरपर्यंत मिरवणूक काढाण्यात आली. तसेच श्रमिक मुक्ती दलाच्या फलकाचे अनावरण व अधिवेशन स्थळावर गेल मव्हेट यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी इंदूताई पाटणकर यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या तीन दिवसांच्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.