Wed, Nov 14, 2018 12:16होमपेज › Satara › तेटलीत बोगस सात-बार्‍याने जागा हडपली

तेटलीत बोगस सात-बार्‍याने जागा हडपली

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:44PMबामणोली : वार्ताहर

शासनाचे संकेतस्थळ हॅक करून तेटली (ता. जावली) येथील अस्तित्वात नसलेल्या सर्व्हे नंबरचा बनावट ऑनलाईन सात-बारा तयार करून त्याचे खरेदीदस्त केले. यामध्ये शासनाची सुमारे 59 गुंठे जागा स्वत: च्या नावावर करण्यात आली आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात अज्ञात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये मोठ्या बिल्डरांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

तेटली (ता. जावली) येथे अस्तित्वात नसणारे 102  व 32 क/4 हे दोन सर्व्हे नंबर नसताना ऑनलाईन सात-बारा करून शासनाची 59 गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली आहे. यामध्ये शासनाचे सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाचे संकेतस्थळ हॅक करून हा ऑनलाईन सात-बारा तयार करण्यात आला आहे. हा सात-बारा तयार करून बड्या धेंडांनी शासनाची सुमारे दीड एकर जमीन नावावर करून घेतली आहे. बनावट सात-बारा उतारा करण्यासाठी महसूल विभागातील अधिकार्‍यांनीच बड्या धेंडांना मदत केली असल्याचे समोर येत आहे. 

संबंधितांनी बोगस ऑनलाईन सात-बारा अस्तित्वात आणल्यानंतर त्याचे दस्त बनवले. ते दस्त नोंदणीसाठी आणले असता तहसीलदारांच्या  ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचार्‍याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणामध्ये एक बडा बिल्डर, केळघर, मेढा व सैदापूर येथील काहींनी हा प्रताप केला आहे. या टोळीने महाबळेश्‍वर, कास, बामणोली तापोळा या भागात असे किती घोटाळे केले हे चौकशी केल्यानंतरच बाहेर पडेल यात शंकाच नाही. शासनाची वेबसाईट हॅक करून ऑनलाईन बनावट सातबारा तयार करणे व त्याचा खरेदी दस्त करणे या प्रक्रियेमध्ये महसूल विभागाच्या अधिकार्‍यांचेही हात ओले झाले असल्याची चर्चा आहे. या अधिकार्‍यांचा हात असल्याशिवाय बोगस सातबारे तयार करणे शक्यच नाही.

तापोळा, बामणोली, तेटली ही ठिकाणे पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहेत. महाबळेश्‍वर, पाचगणीप्रमाणे या ठिकाणी जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबई-पुण्यातील अनेक गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय लोकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी केल्या आहेत. या जागांच्या  व्यवहारातून कोट्यवधी रुपये मिळत असल्याने येथे जमिनीचे दलाल निर्माण झाले आहे. त्यांच्या माध्यमातूनच बोगस दस्तावेज तयार करून जमिनी विकल्याचे समोर आले आहे.