Wed, Apr 24, 2019 00:24होमपेज › Satara › मला घडवणारे शिक्षक

मला घडवणारे शिक्षक

Published On: Sep 05 2018 10:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:41AMआनंदराव रामचंद्र पवार.( रा. औंध, जॅतापूर-सातारा)

परिस्थितीने मला शिक्षणासाठी औंध (ता.खटाव जि. सातारा) येथून परत पंढरपूर (जि. सोलापूर) येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घ्यायला लावले. परत पोटाचे हाल व्हायला लागल्यावर तेथून परत औंध (गणेशवाडी)मध्ये आलो, गुरं राखू लागलो! शाळा सोडली होती. असंच एकदा आज्जीच्या  पायात कुरूप झाले होते म्हणून मी इतर दूध घालायला जाणाऱ्या बायकांबरोबर दुधाचा रतीब घालायला औंधला आलो. डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या पोलिस लायनीत (कॉलनी)दूध घालून खाली गावात असणाऱ्या डॉक्टर आणि शिक्षकांना दूध घालत असताना त्यातील राजाराम यलमारे या दयाळू शिक्षकाने माझी आस्तेवाईक पणे विचारपूस करून मला परत औंधमध्ये इयत्ता आठवीला प्रवेश घ्यायला लावला आणि बोलले ‘‘मी तुझे सर्व बघतो. तू माझ्या जवळच शिकायला रहा! मला खूप आनंद झाला. मी आज्जीला ही माहिती दिली, ती मला सोडायला तयार नवहती. न्हायव्हय करता ती मला सोडायला तयार झाली.

मी शाळेत जायला लागलो. मला चांगले चुंगले खायला मिळू लागले. सर हाताने करून खात होते, मग मी अभ्यासा बरोबरच त्यांना कामात मदत करू लागलो, कपडे धुणे, भांडी घासणे, भुई सारा काढणे अशी बारीक सारीक कामे करू लागलो. मी अगोदरच हुशार होतो. माझा दुसरा नंबर आला. मग सरांनी मला त्यांच्या टाळगाव (ता.कराड जि. सातारा) या गावी नेले आणि उंडाळे येथील स्वा. कै. दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे येथे प्रवेश घेतला. सर टाळगाव पासून दोन किलोमीटर दूर रानात डोंगरच्या पायथ्याला जंगल सदृश्य भागात राहायचे. म्हणजे त्यांची तेथे वस्ती होती. टाळगाव मधून मोठा ओढा वहायचा, तो दक्षिण मांड नदी म्हणून ओळखला जातो. तर त्या ओढ्याला वर असणाऱ्या घोगावचा बंधारा भरला म्हणजे खूप मोठे पाणी यायचे, पुरच यायचा, तो साधारण आठवडाभर काही कमी व्हायचा नाही म्हणजे पाणी कमी होत नसे. सहाजिकच त्यामुळे माझी शाळा बुडत असे.
सरांच्या घरी शेती वाडी, जनावरं होती, लिंबू, केळीची बाग होती. मला शेतीचा अगोदरच नाद होता. मग मी शाण-घाण, वैरण काडी बघून शाळा शिकू लागलो. मी टाळगाव वस्ती ते उंडाळे असे पाच ते सहा किमीचे अंतर चालत शाळेला जात असे. अश्यातच पावसाळ्यात भला मोठा पाऊस पडल्यामुळे दक्षिण मांड नदी दुथडी भरून वाहू लागली. पाऊस उघडला तरी नदीचे पाणी ओसरायचे नाव घेत नवहते, परिणामी माझी शाळा बुडू लागली. 

पाणी ओसरल्यावर मी शाळेत गेलो, त्याच शाळेच्या महाविद्यालयात एक कडक शिस्तीचे प्राध्यापक होते. प्रा. कुमार आडके सर. शाळा ग्रामीण भागात असल्याने माझ्या सारखीच बरीच मुले ही घरातील कामामुळे, अनिश्चिने शाळा बुडविलेले होते. प्रार्थना संपल्यावर  आम्हाला जाग्यावर उभे राहायला सांगून शिक्षा करायला सुरुवात केली. आडके सर फार तापट स्वभावाचे होते. शिक्षा करताना मुले चडड्या ओल्या करायची. असा त्यांचा मार असायचा. लाथाच घालायचे, त्यावर कोणीही आई-वडील तक्रार करत नसत, उलट चांगला मार द्या?म्हणूनच सांगायचे!

आता माझा नंबर आला होता, माझ्या वर्ग शिक्षकांनी सांगितले हा मुलगा आठवडा आठवडा शाळेत येत नाही याला चांगला फोडा? कायम गैर हजर असतो. त्‍यामुळे सरांनी मला खूप मार दिला, लाथा घातल्या, मग मी त्यांना माझी सर्व माहिती दिली. कुठून येतो? कुठला? शाळा शिकायची आहे का? असे सवाल जवाब झाल्यावर त्यांनी मला ऑफिस समोर थांबायला सांगून ते वर्गावर शिकवायला गेले! 

मी पाण्याच्या टाकीवर जावून खूप रडलो, माझ्या नशीबाला दोष देत तोंड धुतले आणि वर्गात जाऊन बसलो. मला हुंदके आवरता येत नव्हते म्हणून मला शेवटच्या बाकावर बसविले गेले. शाळा सुटली, मी ऑफिस समोर उभा राहिलो. आडके सरांनी मला त्यांच्या गाडीवर बसविले आणि थेट टाळगावच्या माझ्या वस्तीवर आणले. आम्हाला बघताच येलमारे सरांची मंडळी म्हणाल्या, "आरं आण्णा!"अशी आनंदाने हाक मारली मी चकारलोच ही काय भानगड म्हणून दप्तर ठेवले आणि हात पाय धुवून दारात बसलो. तो पर्यंत वहिनींनी (येलमारे सर यांची मंडळी)आडके सरांना चहा दिला! बोलणे झाले, मी याला उंडाळयाला वस्ती गृहात ठेवणार आहे, त्याचे साहित्य न्यायला आलो आहे, असे सरांनी सांगितले. मग आम्ही जेवण केले. बोलण्याच्या ओघात मला समजले की आडके सर हे यलमारे सर यांचे सख्खे मेवहुने आहेत. मग मला जरा आधार आला.

जेवण झाल्यावर माझी पत्र्याची पेटी बाहेर काढली,  त्यात दप्तर, कपडे भरले सर्वांचा निरोप घेवून आम्ही उंडाळ्यातील वस्ती गृहात आलो. सगळे सोपस्कार झाले आणि आडके सर त्यांच्या गावी कासेगावला गेले. माझ्या सारखीच तिथे मुले होती, शिवाय पंढरपूरचा आश्रमचा अनुभव असल्यामुळे मला करमुण गेले, तरी सुदधा एक प्रकारची मनात भीती होती.

माझे शिक्षण चालू झाले, मला शाळेत खूप मित्र मिळाले, अश्या रीतीने माझे उंडाळ्यात बस्तान बसले, मला होस्टेलमध्ये अभ्यासाला भरपूर वेळ मिळाला. सरांचा भाच्चा दिलीप तोही हॉस्टेल मध्ये राहायला आला. मग आम्ही दोघे एकत्र शाळेत जावू लागलो. एका शनिवारी सरांनी आम्हाला कपडे घालून तयार राहायला सांगितले होते. दिलीप म्हणाला आपल्याला कासेगावला सुट्टीला जायचे आहे. मला आनंद झाला आणि आम्ही त्यांच्या हिरो होंडा (MGJ-1372) गाडीने कासेगावला पोहोचलो. 

घर कुठले तो एक मोठा वाडाच होता, दुमजली जुन्या धाटणीचे ते घर होते. समोर भली मोठी जनावरांची दावण होती, दोन बैलं, गाई-म्हेशी, वासरं-रेडकं, शेरडं-करडं झालेच तर एक धनगरी तांबडा घोडा ही होता. शेडमध्ये गाड्या दोन गाड्या हिरवीगार वैरण उभी करून ठेवली होती. माणसं म्हणाल तर 30 ते 35 जणांचा तो गोकुळ वाडाच भासत होता. त्यात एक वर्षे ते पार 80 तर 85 वर्षांची धडधाकट आज्जी ही होती. सगळी आपापल्या कामात व्यस्त होती. जेवण खाणं करून आम्ही जवळच असणाऱ्या रानात गेलो. पहातो तर काय सगळे बागायती क्षेत्र ऊस, टोमॅटो, काकडी, पपई, केळी, गुलाब, काय नाही सर्व काही होते, या बरोबरच होती ती सर्वांची एकी आणि एकत्र कुटुंब पद्धती आणि सर्वात महत्वाचा होता तो जिव्हाळा जो सर्वांना जोडून ठेवत होता. 

या घराचा एकच नियम होता तो म्हणजे फक्त जेवण होई पर्यंतच तुम्ही या घरात पाहुणे आहात, नंतर तुम्ही आपोआप त्या घराचेच एक सदस्य होऊन जाता. त्या प्रमाणे माझेही झाले लगेच घमेले घेऊन मजूर बायकांनी तोडलेले टोमॅटो आणायला सुरुवात केली. कधी संध्याकाळ झाली हे समजलेच नाही. आज पर्यंत हा भाजी पाला फक्त बाजारातच पाहिला होता आणि आज तो स्वतः वाहत होतो. मध्ये आधी लाल भडक टोमॅटो खात ही होतो, काकडी, पपई खात होतो. अगदी घरच्यावाणी. 

मग हे माझे कासेगावला दर शनिवारी येणे जाणे चालूच झालं, मी वाटच बघत असे की कधी एकदा शनिवार येतोय आणि मी कासेगावला जातोय. एवढा लळा मला या अनोळखी लोकांनी लावला होता. आमचा अभ्यास चालूच होता, इयत्ता नववीला माझा सातवा नंबर आला, मग मात्र सर्व शिक्षकांचे माझ्यावर लक्ष्य राहीले. दिलीप सरांना मामा म्हणायचा मग मी ही आपोआप त्यांना मामाच म्हणू लागलो. अगदी शाळेतही, त्यामुळे मला सर्व जण आडके सरांचा भाचाच समजू लागले अगदी शिक्षक सुदधा. 

दहावीला प्रवेश घेतला, अभ्यास चालू झाला, याच दरम्यान कासेगावला येणे जाणे चालू राहिले. दिवसा मागून दिवस सरत होते. दहावीच्या वार्षिक परीक्षेचा फॉर्म भरन्याची वेळ होती आणि क्लार्कने मला न विचारताच माझा फॉर्म भरला. तो जेव्हा रि चेर्किंगला आला तेव्हा मला घामच फुटला, त्यात चक्क माझी 'हिंदु रामोशी'म्हणून नोंद झाली होती. यावर स्टाफरुममध्ये बरीच चर्चा घडली. यावर मामांचे एकच उत्तर होते, "रक्ताच्या नात्या पेक्षा ही जोडलेले नाते असू शकत नाही का? "यावर सर्व अवाक झाले होते! मग मी इयत्ता दहावी चांगल्या मार्कंनी पास झालो!(63%42)याच दरम्यान मामांनी माझ्या धाकट्या बहिणीचे लग्नही  करून तिला संसाराला लावली होती. (मला उंडाळ्यामध्ये डी. एडला प्रवेश मिळत होता, पण मला नोकरी करायची होती, शिवाय पैश्याचा प्रश्न होता म्हणून मी नोकरी करायचे ठरविले आणि फसत गेलो ते गेलो!)

दहावीला मार्क चांगले पडले. मी मुंबईला चांगली नोकरी मिळेल म्हणून गेलो, पण मुंबई मला काय भावली नाही. सहा सात महिन्यातच मी मुंबई सोडून परत कासेगावला आलो, शेती करू लागलो. परत मामांनीच मला इयत्ता अकरावीला अडमिशन घ्यायला लावले मग काम करत करत माझे शिक्षण चालू झाले. निसर्ग नियमाने वय वाढत होते, एक तर घरची परिस्थिती गरिबीची, यातच लग्नाचे स्थळ बोलून आले. मी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मी लग्नाला तयार झालो, सर्व तयारी झाली आणि अचानक तिकडून निरोप आला यंदा काही लग्न करायचे नाही? मी एस वाय ला होतो, पेपर चालू होते. अभ्यासावर परिणाम झाला मी दोन्ही ठिकाणी नापास झालो. 

मधला काळ फार भयानक गेला. औंधला सुट्टीसाठी गेल्यावर पांडुरंग लोहार या माझ्या  बालमित्रासाठी मुलगी बघायला म्हणून गेलो, परंतु त्याचे लग्न न ठरता माझेच ठरले. आठवड्यात सर्व काही बोलाचाली होऊन माझे लग्न इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या संगमावर झाले. यावेळी आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आणि माझी सत्य परिस्थिती सांगून ही सासरची मंडळी मुलगी द्यायला तयार झाले. मी सांगितलेले त्यांनी सर्व खोटे समजून विश्वास ठेवला, लग्न झाले, आठ बाय दहाच्या खोलीमध्ये संसार चालू झाला.

मी रानात रोजगाराने जाऊ लागलो. काही मिळेल त्यात आनंदाने गुजारा चालला होता. काही दिवसातच घरात पटेनासे झाले. भांडणे चालू झाली, मग मी मंडळीला घेऊन परत कासेगावला राहायला गेलो आणि तेथे झोपडी बांधून राहू लागलो. अश्या प्रकारे मी परत मामांच्या सानिध्यात आलो. त्यांनीही मला आधार दिला, सर्व सुरळीत चालू झाले, ते आज तागायत आमचे ऋणानुबंध वाढतच आहेत, अगदी सख्या भाच्या सारखे त्‍यांनी मला धरले आहे. 

अशा या गुरूने मला वर्गात प्रत्येक्ष शिकविले नाही परंतु, या दुनियेत उभे राहायला शिकविले, ते ही अशा वेळी ज्या वेळी मला माझ्या रक्ताच्या नात्याची गरज होती. अशा वेळी मला मामांसारख्या जोडलेल्या लोकांनी जवळ केले आणि ती जवळीकता, जिव्हाळा अजूनही अबाधित आहे, ती अशीच कडेवर जावो हीच त्या विश्वविधात्याला प्रार्थना!

यलमारे सर आणि  मामांनी माझ्या सारख्या अनेक  होतकरू  विध्यार्थ्यांना आधार देऊन शिक्षित केले आहे. त्यांना आपल्या पायावर उभे केले आहे आणि अजूनही करत आहेत. ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या विश्वातील सर्व लहान थोर  गुरुवर्यांना गुरू पौर्णिमे च्या खूप खूप शुभेच्छा.